आमीर सुहेल वाणी
काश्मीरमध्ये वर्षं नुसती मोजली जात नाहीत, तर ती सोसली जातात, आठवणीत ठेवली जातात आणि मनातून अनुभवली जातात. इथे काळ कधीच सरळ रेषेत चालत नाही; तो झेलम नदीसारखा वळणावळणाने वाहतो—कधी अस्वस्थ, कधी संथ, पण कायम आठवणींची शिदोरी सोबत घेणारा. जेव्हा काश्मिरी जनता २०२५ सालाकडे मागे वळून पाहेल, तेव्हा त्यांना हे वर्ष केवळ घोषणांचे वाटणार नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे 'ऑपरेशन सिंदूर' होऊनही, हे वर्ष एका वेगळ्या आणि मौल्यवान गोष्टीसाठी लक्षात राहील: ती म्हणजे काश्मीरने पुन्हा घेतलेला मोकळा श्वास.
एवढं सगळं होऊनही खोऱ्यातली शांतता ढळली नाही, हे विशेष. ही शांतता काही डामडौलात किंवा मोठ्या गाजावाजात आली नाही. ती अगदी हळूच, जमिनीत बर्फ विरघळावा किंवा बदामीची फुले विनाआवाज उमलावीत तशी आली. ती साध्या साध्या क्षणांतून दिसू लागली—मुले आता मागे वळून न पाहता शाळेत जाऊ लागली, दुकानदार रात्री उशिरापर्यंत न घाबरता दुकाने उघडी ठेवू लागले आणि उद्याचा सूर्य नेहमीसारखाच उजाडेल या खात्रीने कुटुंबे लग्नाची नियोजनं करू लागली. ज्या प्रदेशात वर्षानुवर्षं अनिश्चिततेची टांगती तलवार होती, तिथे वेळेवर विश्वास ठेवणं हीच एक मोठी क्रांती होती.
सामान्य जगणं आता खास झालंय
२०२५ मध्ये 'नॉर्मल' असणं हेच एक आश्चर्य ठरलं. बस आणि गाड्या वेळेवर धावू लागल्या. बाजारपेठा रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या दिसू लागल्या. लोकांच्या गप्पा आता पुन्हा व्यावहारिक आणि वैयक्तिक विषयांकडे वळल्या—मग ते हवामानाचे अंदाज असोत, परीक्षेचे निकाल असोत, व्यवसायाच्या संधी असोत किंवा आरोग्याच्या गरजा. चिंतेच्या सावलीत दबलेले हे विषय आता मोकळेपणाने चर्चिले जाऊ लागले. आयुष्य आता तात्पुरतं उरलं नव्हतं, तर ते प्रवाही झालं होतं. गावोगावच्या लोकांना जाणवू लागलं की शांततेचा अर्थ आता भीती राहिलेला नाही. ही शांतता कष्टाने मिळवलेली होती.
विकासाच्या ज्या चर्चा आतापर्यंत हवेत असायच्या, त्या २०२५ मध्ये प्रत्यक्ष जमिनीवर दिसू लागल्या. दिल्ली आणि काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी हा तर या शतकातला सर्वात मोठा बदल ठरला. यामुळे केवळ येण्या-जाण्याची सोय झाली नाही, तर मानसिक दुरावाही कमी झाला. रस्त्यांच्या जाळ्याने केवळ ठिकाणे जोडली नाहीत, तर माणसे आणि संधी एकमेकांना जोडल्या गेल्या.
डिजिटल क्रांतीमुळे ईशान्येतील दुर्गम भागातील एकाकीपणा संपला. आता लांबच्या खेड्यातला विद्यार्थी न थांबता ऑनलाइन क्लास करू शकतो आणि एखादा तरुण उद्योजक मधल्या दलालाशिवाय आपली काश्मिरी कलाकुसर जगाच्या बाजारात विकू शकतो. विकास जेव्हा खऱ्या अर्थाने काम करतो, तेव्हा तो टाळ्यांची मागणी करत नाही; तो शांतपणे लोकांच्या जगण्याचा भाग बनतो.
आरोग्य सेवाही आता लोकांच्या दारापर्यंत पोहोचली. सुधारलेली रुग्णालये, फिरती वैद्यकीय पथके आणि टेलिमेडिसिनमुळे उपचारांसाठी होणारा लांबचा प्रवास आणि वणवण कमी झाली. अनेकांसाठी प्रगती म्हणजे कागदावरची आकडेवारी नसून वाचलेला वेळ, कमी झालेली चिंता आणि जपलेला स्वाभिमान आहे. या बदलांनी दुःख पूर्णपणे संपवले नाही, पण त्या दुःखासोबत जगण्याची ताकद मात्र नक्कीच दिली.
युवा पिढी आणि शक्यतांची भाषा
२०२५ मधील सर्वात मोठा बदल काश्मीरच्या तरुण पिढीच्या मनात झाला. वर्षानुवर्षं अनिश्चिततेच्या वातावरणात वाढलेल्या या तरुणांनी आता 'शक्यतांची भाषा' शिकायला सुरुवात केली आहे. कौशल्य विकास केंद्रे, स्टार्टअप्स, स्पोर्ट्स अकॅडमी आता निराशेऐवजी आशेची केंद्रे बनली आहेत. फुटबॉलच्या मैदानात पुन्हा एकदा हसण्याचे आणि स्पर्धेचे आवाज घुमू लागले. वाचनालये भरू लागली. भविष्याबद्दल असलेली भीती आता जिद्दीत बदलली आहे.
पर्यटनही आता एका नव्या लयीत परतले आहे. पर्यटक आता केवळ काश्मीरचे सौंदर्य पाहायला येत नाहीत, तर इथल्या लोकांचे अनुभव ऐकायलाही येतात. 'होमस्टे'च्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळाला आणि त्यांचा स्वाभिमानही जपला गेला. स्थानिक गाईड्स आता केवळ ठिकाणांची माहिती देत नाहीत, तर इथल्या संस्कृतीचे आणि संघर्षाचे खरे सांगणे मांडतात.
काश्मीरची शांतता कायमच नाजूक राहिली आहे. पण २०२५ मध्ये ही शांतता टिकवून ठेवण्यात सामान्य माणसाचा, महिला गटांचा आणि सांस्कृतिक मंडळांचा मोठा वाटा आहे. सुरक्षा व्यवस्था प्रभावी होती, पण ती डोळ्यांना खुपसेल अशी नव्हती. दैनंदिन जीवनात कोणताही अडथळा न येणे, हेच सुरक्षा यंत्रणेचे यश होते. यामुळे लोकांना पुढच्या भविष्याचं नियोजन करण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली.
काश्मीरने २०२५ मध्ये आपल्या जखमा विसरल्या नाहीत, तर त्या जखमांना कुरवाळत न बसण्याचा कठीण निर्णय घेतला. बागायतदारांनी विश्वासाने फळबागा लावल्या, पालकांनी आपल्या मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक केली. छोट्या व्यावसायिकांनी विस्तार केला, कलाकारांनी नवनिर्मिती केली आणि विद्यार्थ्यांनी स्वप्नं पाहिली. काश्मीरमधील ही आशा आंधळी नाही; ती अनुभवातून तावून सुलाखून निघालेली आहे.
इतिहास कदाचित २०२५ साल खूप नाटयपूर्ण म्हणून नोंदवणार नाही. पण काश्मिरी लोक हे वर्ष असं वर्ष म्हणून लक्षात ठेवतील, जेव्हा आयुष्य थोडं हलकं वाटलं, जेव्हा शांततेचा अर्थ भीती नव्हता आणि केवळ 'तग धरून राहण्यापेक्षा' खरं 'जगण्याला' सुरुवात झाली. काश्मीरमध्ये एक जुनी म्हण आहे—खूप मोठ्या हिवाळ्यानंतर पालवी फुटणं हे केवळ शक्यच नाही, तर ते अनिवार्य असतं.
दरवर्षी वसंत ऋतूत उमलणाऱ्या बदामीच्या फुलांप्रमाणे, २०२५ च्या काश्मीरने स्वतःला आणि जगाला पुन्हा एकदा आठवण करून दिली की काश्मीरला अजूनही बहरता येतं!
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -