२० हजार कोटींच्या 'अलहिंद ग्रुप'चे विमानवाहतूक क्षेत्रात पदार्पण!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात एका नव्या कंपनीचे आगमन होत आहे. केरळमधील कोची येथून कामकाज चालवणाऱ्या 'अलहिंद एअर'ला विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या नवीन एअरलाईनचे नेतृत्व मोहम्मद हॅरिस टी करत आहेत. आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झालेली ही कंपनी नक्की कोणाची आहे आणि तिचे मालक कोण आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कोण आहेत मोहम्मद हॅरिस? 

मोहम्मद हॅरिस हे 'अलहिंद समूहा'चे (Alhind Group) अध्यक्ष आहेत. हा समूह ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात भारतातील एक अग्रगण्य नाव मानले जाते. या समूहाची उलाढाल तब्बल २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मोहम्मद हॅरिस यांचा जन्म केरळमधील कोझिकोड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही याच शहरात पूर्ण झाले. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ बँकॉक येथे व्यतीत केला. त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी १९९३ मध्ये 'अलहिंद ट्रॅव्हल्स अँड टूर्स' या नावाने आपला व्यवसाय सुरू केला.

लहान एजन्सी ते एअरलाईन मालक 

सुरुवातीला विमान तिकीट बुकिंग आणि ट्रॅव्हल एजंट म्हणून काम सुरू केलेल्या हॅरिस यांनी आपल्या व्यवसाचा प्रचंड विस्तार केला आहे. आज त्यांची कंपनी अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची 'जनरल सेल्स एजंट' म्हणून काम पाहते. भारतात आणि परदेशात मिळून त्यांच्या १३० हून अधिक शाखा आहेत. अलहिंद समूहाचा व्यवसाय केवळ तिकीट बुकिंगपुरता मर्यादित नाही, तर हॉलिडे पॅकेजेस, हॉटेल बुकिंग, मनी एक्सचेंज, व्हिसा सेवा आणि चार्टर फ्लाईट्स अशा विविध क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. आता त्यांनी स्वतःची एअरलाईन सुरू करून एक मोठे पाऊल उचलले आहे.

कशी असेल 'अलहिंद एअर'ची सेवा? नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मिळालेल्या 'ना हरकत प्रमाणपत्रा'नुसार (NOC), अलहिंद एअर लवकरच आपली सेवा सुरू करेल. सुरुवातीला कंपनी प्रादेशिक मार्गांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यांच्या ताफ्यात सुरुवातीला ३ एटीआर-७२ (ATR-72) टर्बोप्रॉप विमाने असतील. दक्षिण भारतातील कोचीन, बेंगळुरू, तिरुवनंतपुरम आणि चेन्नई या प्रमुख शहरांना जोडण्याचे काम ही एअरलाईन करेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विमानांची संख्या वाढवून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना कंपनीने आखली आहे. विमानवाहतूक क्षेत्रात आधीच असलेल्या स्पर्धेत अलहिंद एअर प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करेल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter