जावेद मात्झी
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर आणि आसपासच्या भागातील केशर उत्पादक आधीच हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना तोंड देत आहेत. त्यातच आता साळिंदरांमुळे मोठ्या प्रमाणावर केशराच्या कंदांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे. तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आधीच घटलेले केशर उत्पादन आणखी घसरू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंपोर, कोनिचत, दुसू, लेबपोरा आणि आसपासच्या भागातील उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, साळिंदर दररोज रात्री शेतात घुसून कंद उकरून खातात. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
शेतकऱ्यांची व्यथा
कोनिबल येथील शेतकरी अब्दुल रशीद शाह म्हणाले, "हवामान बदलामुळे आमचा पीकचक्र आधीच विस्कळित झाले आहे. अनियमित पाऊस आणि दीर्घकाळ कोरडे हवामान यामुळे केशराचे मोठे नुकसान झाले आहे. आता साळिंदर उरलेलेही संपवत आहेत. कंद खराब झाला की फुल येत नाही. आमच्या उपजीविकेवर बेट परिणाम होत आहे." पंपोर येथील इशरत अहमद यांनी सांगितले, "फळबागांसाठी झाडांना कुंपण घालणे किंवा खोड झाकून ठेवणे असे उपाय करता येतात; पण केशरासाठी तशी साधने नाहीत. आम्ही दिवे, आवाज, हॉर्न वापरून साळिंदरांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो; पण संपूर्ण रात्र जागरण शक्य नाही. ते पुन्हा पुन्हा परत येतात. कितीही प्रतिकार केला तरी साजिदरांचा शेतीला मोठा त्रास होत आहे."
हा काळ धोकादायक
शेतकऱ्यांच्या मते, डिसेंबर ते मार्च हा काळ कंदांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो, याच काळात साळिंदर मोठ्या प्रमाणावर कंद उकरून खातात, ज्यामुळे भविष्यातील उत्पादनावर वाईट परिणाम होतो. काश्मीरमधील केशर उत्पादन हवामान बदल, सिंचनाची कमतरता, उच्च दर्जाच्या कंदांचा अभाव आणि लागवडीचे क्षेत्र कमी होणे अशा अनेक कारणांमुळे आधीच घटले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "साळिंदर आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील काही वर्षात शेतात कंदच उरणार नाहीत."
सरकारकडे मागणी
लेथपोरा येथील एका शेतकऱ्याने सांगितले, "आम्ही तज्ञ्ज नाही. सरकारने वैज्ञानिक आणि तांत्रिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि शाश्वत उपाय शोधावेत. आतापर्यंत दीर्घकालीन उपाय दिला गेलेला नाही." स्थानिकांनी सांगितले की, त्यांनी वारंवार कृषी विभाग आणि वन्यजीव विभागाला समस्या कळवली आहे; पण ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. "आम्हाला फक्त नुकसानभरपाई नको, तर प्रतिबंधात्मक उपाय हवेत. पंपोरचे केशर जगभर प्रसिद्ध आहे. जर लागवड आणखी कोसळली तर शेतक-यांसोबतच काश्मीरची ओळखही धोक्यात येईल," असेही काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.