भारतीय विद्यार्थी कॅनडात असुरक्षित; टोरोंटोमध्ये शिवांक अवस्थीची गोळ्या झाडून हत्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
शिवांक अवस्थी
शिवांक अवस्थी

 

कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. टोरोंटोमधील विद्यापीठाजवळ एका २० वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवांक अवस्थी असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे कॅनडातील भारतीय समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, हिमांशी खुराना या तरुणीच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांतच ही दुसरी घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना टोरोंटोच्या इटोबिकोक भागात घडली. शिवांक हा हंबर कॉलेजच्या नजीक असलेल्या भागात होता. त्याच वेळी अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांना शिवांक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने हल्लेखोराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच हिमांशी खुराना या तरुणीची अशाच प्रकारे हत्या झाली होती. त्या घटनेची चर्चा थांबत नाही तोच शिवांकची हत्या झाल्याने पालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवांकच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कॅनडातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.