२०२५ सालात सोशल मीडियाने घडवले 'हे' ५ जागतिक आयकॉन!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सोशल मीडियाने सामान्य व्यक्तींना जागतिक आयकॉन बनवले आहे. टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सनी डिजिटल इन्फ्लुएन्सर्सची एक नवी पिढी निर्माण केली आहे. ही पिढी ट्रेंड्स, मते आणि युवा संस्कृतीला आकार देते. फैसल शेख, अवेझ दरबार, अर्शिफा खान, रियाझ अली आणि जन्नत जुबेर ही हिंदुस्थानातील या डिजिटल क्रांतीची प्रमुख उदाहरणे आहेत.

फैसल शेख : संघर्षातून यशाकडे 

फैसल शेखला 'मिस्टर फैजू' या नावाने ओळखले जाते. तो सौंदर्य, फिटनेस आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित एक प्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व आहे. तो इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून तिथे त्याचे ३३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. फैसलने कोका-कोला, जिलेट, वनप्लस आणि स्पायकरसारख्या मोठ्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. त्याचे खरे नाव फैसल शेख असून तो २८ वर्षांचा आहे.

सुरुवातीला त्याला टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि नंतर इन्स्टाग्रामवरही त्याने मोठे यश मिळवले. त्याची सामग्री तरुण प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे ती साधी, विनोदी आणि समजायला सोपी असते. फैसल आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर सायबरबुलिंग आणि मानसिक आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर बोलण्यासाठी करतो.

दिवसाला केवळ ५० रुपये कमावण्यापासून ते एक यशस्वी इन्फ्लुएन्सर, उद्योजक आणि रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार बनण्यापर्यंतचा फैसल शेखचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. प्रसिद्धी मिळण्यापूर्वी तो आपल्या वडिलांच्या छोट्या व्यवसायात मदत करत असे. त्यात कष्टाचे काम आणि कमी उत्पन्न होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने वयाच्या २१ व्या वर्षी लिंकिंग रोडवर सेल्समनची नोकरी स्वीकारली. ग्राहकांना कपडे खरेदी करण्यासाठी आकर्षित करताना उन्हात ९ तास काम करून ५० रुपये मिळत असत, अशी आठवण त्याने सांगितली. आज त्याच्याकडे स्वतःचे आलिशान घर, महागड्या गाड्या आणि एक शक्तिशाली वैयक्तिक ब्रँड आहे.

अवेझ दरबार : डिजिटल युगातील डान्स आयकॉन 

अवेझ दरबार हा हिंदुस्थानातील एक नामांकित डान्सर, कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तो इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असून तिथे त्याचे ३०.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अवेझने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेप्सीसारख्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. तो आपल्या उत्साहपूर्ण आणि सर्जनशील डान्स व्हिडिओंसाठी ओळखला जातो. त्याचे हे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. त्याने अनेक बॉलीवूड चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंसाठी कोरिओग्राफी केली आहे.

अवेझला टिकटॉकच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिथे त्याच्या डान्स आणि लिप-सिंक व्हिडिओंनी जगभरातील लाखो चाहत्यांना आकर्षित केले. हिंदुस्थानात टिकटॉकवर बंदी आल्यानंतरही त्याने इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूबवर आपला प्रवास यशस्वीपणे सुरू ठेवला. त्याने आपली डिजिटल उपस्थिती मजबूत ठेवली आहे. तो अतरंगझ (Atrangz) स्टुडिओचा संस्थापक देखील आहे. हे डान्स कंटेट आणि मनोरंजन क्षेत्रातील सहयोगासाठीचे एक क्रिएटिव्ह हब आहे.

अवेझचा जन्म १६ मार्च १९९३ रोजी मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थान येथे झाला. तो एका प्रसिद्ध संगीतकार कुटुंबातून येतो. सर्जनशील वातावरणात वाढल्यामुळे लहानपणापासूनच त्याची नृत्याची आवड जोपासली गेली. त्याने मुंबईत डान्स कोरिओग्राफर आणि प्रशिक्षक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याची वेगळी कोरिओग्राफी शैली, विनोदी स्कीट्स आणि कोल्याबरेशन व्हिडिओंमुळे तो टिकटॉक बंदीपूर्वीच सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या निर्मात्यांपैकी एक बनला होता.

इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर आल्यानंतर अवेझने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरूच ठेवले. त्याने २०१४ मध्ये आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले. तिथे तो डान्स कव्हर्स, कोरिओग्राफी व्हिडिओ आणि बॉलीवूड स्टार्ससोबतचे व्हिडिओ शेअर करतो. त्याने प्रियांका चोप्रा, सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि उर्वशी रौतेला यांसारख्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. आज अवेझ दरबारला हिंदुस्थानातील सर्वात यशस्वी डिजिटल डान्सर्स आणि कोरिओग्राफर्सपैकी एक मानले जाते. तो बॉलीवूड आणि डिजिटल मनोरंजन यांच्यातील दरी कमी करण्याचे काम करत आहे.

अर्शिफा खान : बालकलाकार ते डिजिटल उद्योजिका 

अर्शिफा खान ही जीवनशैली, फॅशन आणि मनोरंजन क्षेत्राशी जोडलेली आहे. ती इन्स्टाग्रामवर अत्यंत लोकप्रिय असून तिथे तिचे ३० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती 'मिशी मी कॉस्मेटिक्स' नावाने स्वतःचा मेकअप ब्रँड देखील चालवते. अर्शिफा खानने टेलिव्हिजनवर बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यामुळे तिला सुरुवातीला ओळख मिळाली आणि नंतर सोशल मीडियावर यश संपादन करता आले. ती यूट्यूबवरही सक्रिय असून तिथे ती आपले अभिनय कौशल्य आणि सर्जनशीलता सादर करते.

अर्शिफाचा जन्म २००३ मध्ये हिंदुस्थानात झाला. तिने आपले प्राथमिक शिक्षण आपल्या मूळ गावी पूर्ण केले. इंटरमीडिएटचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तिने पदवीसाठी एका खाजगी संस्थेत प्रवेश घेतला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला. अभिनयाची तिची आवड काळानुसार वाढत गेली. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिने शोबिजमध्ये सातत्याने काम सुरू ठेवले.

रियाझ अली : जागतिक पसंती मिळालेला सोशल मीडिया स्टार 

रियाझ अली हा स्टाईल आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून तो इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. तिथे त्याचे २७.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याने रॅझ निसिन कप नूडल्स आणि जिओ सिनेमासारख्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. रियाझला टिकटॉकवरील लिप-सिंक व्हिडिओंमुळे लोकप्रियता मिळाली आणि नंतर त्याने आपल्या प्रेक्षकांना यशस्वीपणे इन्स्टाग्रामकडे वळवले. तो नियमितपणे फॅशन, संगीत आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित मजकूर शेअर करतो. हे तरुण प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

रियाझ अलीचे खरे नाव रियाझ आफ्रिन आहे. त्याला एक मोठी बहीण असून ती देखील टिकटॉक व्हिडिओ बनवते. त्याला टिकटॉकच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि प्रवासादरम्यान त्याला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. तो रोमँटिक, क्युट आणि मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करतो. त्याच्या फॉलोअर्सना हे व्हिडिओ खूप आवडतात. रियाझचा जन्म भूतानमध्ये झाला असून त्याचे शिक्षणही तिथेच झाले.

त्याचे टिकटॉकवर २७.५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स होते आणि तो अनेक यूट्यूब व्हिडिओंमध्येही झळकला आहे. त्याच्या एकूण संपत्तीचा अचूक अंदाज लावणे कठीण असले तरी, तो एका प्रायोजित पोस्टसाठी सुमारे एक लाख रुपये कमावतो, असे सांगितले जाते.

जन्नत जुबेर : कौशल्य आणि रणनीतीचा प्रभावी संगम 

जन्नत जुबेरचे बिझनेस मॉडेल हे पारंपरिक ब्रँड जाहिराती आणि आधुनिक डिजिटल उत्पन्नाच्या स्रोतांवर आधारित आहे. या रणनीतीमुळे तिला केवळ आर्थिक यशच नाही, तर जागतिक ओळखही मिळाली आहे. २०२५ पर्यंत तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ४० दशलक्षांच्या पुढे गेली. तिच्या पोस्ट्सना ८ ते १० टक्के एंगेजमेंट रेट मिळतो. हे ब्रँड्ससाठी अत्यंत मौल्यवान असून त्यातून प्रेक्षकांचा भक्कम विश्वास दिसून येतो.

जन्नत जुबेर रहमानी हिने बाल दूरचित्रवाणी अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. आता तिची गणना हिंदुस्थानातील आघाडीच्या डिजिटल इन्फ्लुएन्सर्समध्ये होते. तिचे आकर्षक व्यक्तिमत्त्व, फॅशनची उत्तम जाण आणि लोकांशी नाते सांगणाऱ्या मजकुरामुळे लाखो लोक प्रेरित झाले आहेत. तिचा जन्म २००१ मध्ये मुंबईत झाला. तिला सुरुवातीला टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळाली आणि नंतर चाहत्यांशी थेट जोडले जाण्यासाठी तिने सोशल मीडियाचा अवलंब केला.

हे डिजिटल इन्फ्लुएन्सर्स हिंदुस्थानातील प्रसिद्धीचा बदलता चेहरा दर्शवतात. कौशल्य, सातत्य आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये कसे करू शकते, हे त्यांच्या प्रवासातून अधोरेखित होते. सामान्य परिस्थितीपासून ते जागतिकओळखीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास लाखो लोकांना प्रेरणा देत असून डिजिटल युगात यशाची नवी व्याख्या तयार करत आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter