गुड न्यूज! आता जीमेल आयडी बदलता येणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा असलेल्या जीमेलच्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेकदा आपण एकदा तयार केलेला ईमेल आयडी बदलू शकत नाही, पण आता गुगल या धोरणात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. लवकरच वापरकर्त्यांना त्यांचा सध्याचा जीमेल 'युजर आयडी' किंवा ईमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.

अनेक लोक शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना घाईगडबडीत काहीतरी मजेशीर किंवा विचित्र नावाने ईमेल आयडी तयार करतात. पुढे नोकरीसाठी किंवा व्यावसायिक कामासाठी तोच आयडी वापरताना त्यांना संकोच वाटतो. सध्याच्या नियमांनुसार, एकदा तयार केलेला जीमेल आयडी बदलता येत नाही. तुम्हाला नाव बदलायचे असल्यास नवीन खाते तयार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र, 'अँड्रॉइड ऑथॉरिटी'च्या एका अहवालानुसार, गुगल या समस्येवर तोडगा काढत आहे.

गुगल प्ले सर्व्हिसेसच्या नवीन अपडेटमध्ये (व्हर्जन २४.४५.३३) या फीचरचे काही संकेत मिळाले आहेत. यामध्ये 'ईमेल बदला' (Change Email) असा पर्याय दिसून आला आहे. या नवीन फीचरमुळे वापरकर्ते जुन्या खात्याचा डेटा न गमावता आपला ईमेल आयडी बदलू शकतील. सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात असून ते नक्की कधी लाँच होईल, याबाबत गुगलने अधिकृत घोषणा केलेली नाही.

हे फीचर नक्की कसे काम करेल, याबाबत अजूनही काही प्रश्न आहेत. आयडी बदलल्यानंतर जुन्या ईमेल आयडीवर येणारे मेल्स नवीन आयडीवर वळवले जातील का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हा बदल करण्यासाठी गुगल काही शुल्क आकारणार का, किंवा हे फीचर केवळ 'गुगल वन' (Google One) या पेड सबस्क्रिप्शन असलेल्या ग्राहकांसाठीच मर्यादित असेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. असे असले तरी, या बातमीमुळे जीमेल वापरकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.