कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे भविष्यात माणसांच्या नोकऱ्या जातील अशी भीती सध्या जगभरात व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर झोहो (Zoho) कंपनीचे संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी एक अत्यंत विचारप्रवर्तक मत मांडले आहे. त्यांनी नुकतीच काही नोकऱ्यांची आणि कामांची यादी शेअर केली असून त्यांना AI कडून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
वेम्बू यांनी माणसाच्या स्वत्वाची किंमत (Self-worth) आणि AI यांचा थेट संबंध जोडला आहे. आपण आपली किंमत केवळ आपण मिळवणाऱ्या पैशांवरून किंवा बौद्धिक प्रतिष्ठेवरून ठरवत असू तर AI आपल्यासाठी नक्कीच एक मोठे आव्हान ठरू शकते. भविष्यात यंत्रे ही कामे माणसांपेक्षा अधिक वेगाने आणि अचूकपणे करू शकतील.
परंतु अनेक कामे पैशांसाठी नसून आवड, सेवा आणि माणुसकीच्या भावनेतून केली जातात. अशा कामांना कृत्रिम बुद्धिमत्ता कधीच स्पर्श करू शकणार नाही. या सुरक्षित कामांची यादी देताना त्यांनी लहान मुलांची काळजी घेणे, त्यांना शिकवणे आणि घरातील वृद्धांचा सांभाळ करणे यांसारख्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. शहरातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून केवळ आवडीपोटी शेतीकडे वळणारे लोक किंवा निसर्गावरील प्रेमापोटी जंगलात फॉरेस्ट रेंजर म्हणून काम करणारे लोक यांची जागा कोणतेही यंत्र घेऊ शकत नाही.
याशिवाय मंदिरात दर्शनासाठी कुणीही नसतानाही दररोज न चुकता देवाची पूजाअर्चा करणारे स्थानिक पुजारी आणि केवळ पैशांसाठी न गाता स्वतःच्या आनंदासाठी गाणारे शास्त्रीय संगीतकार अशा लोकांच्या कामावर AI चा कोणताही परिणाम होणार नाही. ही सर्व कामे पैशांच्या मोहापायी केली जात नाहीत. त्यामुळे AI मुळे या लोकांचे महत्त्व किंवा त्यांच्या जगण्याचा उद्देश कधीच कमी होणार नाही. जसजसे तंत्रज्ञान वाढत जाईल तसतसा मानवी समाज अशा अर्थपूर्ण आणि माणुसकी जपणाऱ्या कामांकडे अधिक वळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेम्बू यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. विष्णू अग्रवाल नावाच्या एका युझरने यावर प्रतिक्रिया देताना आर्थिक पाठबळाशिवाय आवडीची कामे टिकू शकत नसल्याचे म्हटले. त्याने युरोपमधील जुन्या काळातील मेडिसी कुटुंबाचे उदाहरण दिले. त्यांच्याकडे असलेल्या अफाट संपत्तीमुळेच तिथले कलाकार आणि संगीतकार जगू शकले. जर AI मुळे लोकांच्या नोकऱ्याच गेल्या तर या कला आणि संस्कृतीला जगवण्यासाठी पैसा कुठून येईल असा सवाल त्याने विचारला.
यावर श्रीधर वेम्बू यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले. इथून पुढे पैशांच्या पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. AI आणि नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादनात प्रचंड वाढ होईल आणि सर्वत्र मुबलकता येईल. खरा प्रश्न उत्पादनाचा नसून वितरणाचा असेल. जेव्हा तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतील पण उत्पादन वाढेल तेव्हा हा वाढलेला नफा आणि सुविधा लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या हा खऱ्या अर्थाने एक राजकीय आणि आर्थिक प्रश्न असेल असे त्यांनी स्पष्ट केले.