नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राभोवतीची ऐतिहासिक प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. शनिवारी पहाटे त्यांचे अंतराळयान प्रशांत महासागरात सुखरूप उतरले असून त्यांचा पृथ्वीवरील परतीचा प्रवास यशस्वी झाला आहे.
अंतराळवीरांना घेऊन जाणारे ओरियन अंतराळयान कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो जवळ प्रशांत महासागरात उतरले. नासा आणि अमेरिकन लष्कराचे संयुक्त बचाव पथक अंतराळवीरांच्या स्वागतासाठी आणि त्यांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी त्या ठिकाणी आधीच तैनात होते. या मोहिमेत नासाचे अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, ख्रिस्तिना कोच आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे.
आर्टेमिस २ मोहिमेची सुरुवात १ एप्रिल रोजी झाली होती. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड ३९ बी वरून संध्याकाळी ६:३५ वाजता नासाच्या स्पेस लॉन्च सिस्टीम (SLS) रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्राला वळसा घातला. ५० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला आहे. या प्रवासात अंतराळवीर आणि जमिनीवरील चमूने ओरियन अंतराळयानाच्या यंत्रणांची सखोल चाचणी केली. यात अंतराळवीरांनी यानातील उपकरणांशी प्रत्यक्ष संवाद साधून विविध तांत्रिक मूल्यमापन केले.
मुळात आर्टेमिस २ ही एक प्रायोगिक चाचणी होती. अंतराळयान, कर्मचारी आणि मोहिमेतील सर्व यंत्रणा चंद्राच्या प्रवासासाठी सक्षम आहेत का, हे तपासणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेद्वारे ओरियन अंतराळयान अवकाशात पाठवण्यात आले. अंतराळवीरांनी चंद्राच्या पलीकडील भागासह संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण केली असून ते आता पृथ्वीवर परतले आहेत.
प्रवासादरम्यान ओरियन यानाने 'ट्रान्स-लूनर बर्न' ही प्रक्रिया पार पाडली. चंद्राभोवती जाण्यासाठी अंतराळयानाला एका अचूक मार्गावर आणणारी ही एक नियंत्रित इंधन ज्वलन प्रक्रिया आहे. चंद्राच्या पाठीमागून प्रवास करताना सुमारे ४० मिनिटे अंतराळवीरांचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला होता. मानवाने पृथ्वीपासून गाठलेले हे आतापर्यंतचे सर्वात लांबचे अंतर ठरले आहे.