बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिने दिग्दर्शित केलेला 'लापता लेडीज' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. समीक्षकांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं. हा चित्रपट लैंगिक समानतेवर आधारित आहे. आता एका विशेष उपक्रमा अंतर्गत 'लापता लेडीज' हा चित्रपट आज ९ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार आहे. हा चित्रपट न्यायाधीश, त्यांचे कुटुंबीय आणि नोंदणी अधिकाऱ्यांना दाखवला जाईल. सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय विभागाने जारी केलेल्या संदेशानुसार, प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आमिर खान व्यतिरिक्त, चित्रपटाचे दिग्दर्शक किरण राव देखील स्क्रीनिंग दरम्यान उपस्थित राहणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या संदेशात म्हंटलं आहे की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या ७५ व्या वर्षात आयोजित केलेल्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, लैंगिक समानतेच्या थीमवर आधारित 'लापता लेडीज' हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रशासकीय इमारत संकुलातील सी. ब्लॉकमध्ये असलेल्या सभागृहात हा प्रदर्शित केला जाईल. नियोजित वेळापत्रकानुसार सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती आपल्या कुटुंबीयांसह चित्रपट पाहण्यासाठी येणार आहेत.
संध्याकाळी ४: १५ ते ६:२० या वेळेत हा चित्रपट दाखवला जाईल. हा चित्रपट सरन्यायाधीश यांच्या पत्नी कल्पना दास यांनी स्टाफसोबत हा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर त्यांनी ही संकल्पना सुचवली. याबद्दल बोलताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हा चित्रपट दाखवण्यात येत आहे.