ख्वाजांच्या दरबारात एकता कपूरची हजेरी; चादर अर्पण करून केली आगामी चित्रपटासाठी दुआ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माती एकता कपूर ही अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देताना
चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माती एकता कपूर ही अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देताना

 

प्रसिद्ध चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माती एकता कपूरने नुकतीच राजस्थानमधील अजमेर येथील जगप्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट दिली आहे. यावेळी तिचा मुलगा रवी कपूर सुद्धा तिच्या सोबत होता. एकता कपूरने दर्ग्यात पूर्ण श्रद्धेने जियारत केली आणि ख्वाजा गरीब नवाज यांच्या पवित्र चौकटीवर नतमस्तक होऊन माथा टेकवला. तिने आपल्या आगामी मोठ्या प्रकल्पांच्या यशासाठी, विशेषतः 'लॉक अप' या शोचा नवीन सीझन आणि 'भूत बंगला' या चित्रपटाच्या यशासाठी साकडे घातले आहे.

एकता कपूरने दर्ग्यात मखमली चादर आणि फुले अर्पण करून पारंपरिक पद्धतीने प्रार्थना केली. तिने आपल्या कुटुंबाच्या, विशेषतः वडील जितेंद्र आणि भाऊ तुषार कपूर यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदासाठी दुवा मागितली. खादिमांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता कपूर जेव्हा जेव्हा एखादा नवीन चित्रपट किंवा मालिका सुरू करते, तेव्हा तिची 'कॉपी' किंवा रील घेऊन ती ख्वाजांच्या दरबारात आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येते. यावेळी सुद्धा तिने आपल्या नवीन प्रकल्पांची प्रत दरबारात सादर करून मन्नतचा धागा बांधला.

तिच्या आगामी कामांबाबत सांगायचे तर, 'लॉक अप' या रियालिटी शोच्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची मोठी उत्सुकता आहे. तसेच 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडी चित्रपटातून एकता प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळे घेऊन येत आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू असून त्यांच्या यशासाठी तिने सुमारे ३० मिनिटे आस्ताना शरीफमध्ये थांबून प्रार्थना केली. दर्ग्याचे खादिम सय्यद इमरान चिश्ती यांनी तिला जियारत घडवली, तर सय्यद गुलफाम चिश्ती यांनी तिला तबर्रुक (प्रसाद) भेट दिला.

मुलगा रवी कपूरसोबतचे एकताचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ख्वाजा गरीब नवाज यांच्यावर कपूर कुटुंबाची मोठी श्रद्धा असून, ही भेट केवळ एक धार्मिक दौरा नसून त्यांच्या परंपरेचा भाग असल्याचे बोलले जाते. एकताने आपल्या व्यवसायात प्रगती आणि कुटुंबात सुख-शांती राहावी, यासाठी बुजुर्ग खादिम सय्यद अब्दुल गनी चिश्ती यांच्याकडून विशेष प्रार्थना करून घेतली. एकताच्या या अजमेर भेटीमुळे तिच्या आगामी चित्रपटांची आणि शोची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे.