सलमानच्या 'मातृभूमी' गाण्यातून देशप्रेमाचा सूर!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
सलमान खान
सलमान खान

 

सलमान खान फिल्म्सचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'ची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निर्मात्यांनी आता चित्रपटातील पहिले गाणे 'मातृभूमी' प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केले आहे. टीझरनंतर समोर आलेली ही पहिली संगीतमय झलक चित्रपटाच्या भावनिक आणि देशभक्तीपूर्ण आशयाची ओळख करून देत आहे. 'मातृभूमी' हे गाणे देशप्रेम, कर्तव्यभावना आणि वैयक्तिक आयुष्यातील भावनिक संघर्ष यांचा समतोल साधताना दिसत आहे. 

गाण्यात सलमान खान भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून, चित्रांगदा सिंह त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. चित्रपटात दोघांना दोन लहान मुलांसह एका कुटुंबाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. या गाण्याला संगीतकार हिमेश रेशमिया यांनी चाल दिली आहे. 'मातृभूमी'चे शब्द समीर अंजन यांनी लिहिले असून, अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाण्याला साज चढवला आहे. 

हे गाणे सलमान खान फिल्म्सच्या म्युझिक लेबलखाली प्रदर्शित झाले असून, सोनी म्युझिक इंडिया ही त्याची अधिकृत संगीत वितरण भागीदार आहे. बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाची निर्मिती सलमान खान यांनी सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. अपूर्व लाखिया यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.