NSA अजित डोवाल रियाधमध्ये दाखल; भारत आणि सौदी अरेबियामध्ये दहशतवादाविरोधात मोर्चेबांधणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सौदी अरेबियातील विमानतळावर स्वागत करताना राजदूत डॉ. सुहेल एजाज खान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उपमंत्री राजदूत डॉ. सौद अल-साती
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सौदी अरेबियातील विमानतळावर स्वागत करताना राजदूत डॉ. सुहेल एजाज खान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उपमंत्री राजदूत डॉ. सौद अल-साती

 

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मंगळवारी सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर रियाधमध्ये पोहोचले. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सातत्याने वाढत जाणारे धोरणात्मक आणि सुरक्षाविषयक संबंध या दौऱ्यातून अधोरेखित होत आहेत.

रियाधमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर सौदी अरेबियातील भारताचे राजदूत डॉ. सुहेल एजाज खान आणि सौदी अरेबियाचे राजकीय व्यवहार उपमंत्री राजदूत डॉ. सौद अल-साती यांनी डोवाल यांचे स्वागत केले.

सुरक्षा सहकार्यावर विशेष भर

दहशतवादविरोधी मोहिमा आणि सुरक्षा मुद्द्यांवर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत होत असतानाच हा दौरा पार पडत आहे. उल्लेखनीय म्हणजे, २८ जानेवारी रोजी सौदी अरेबियाने जम्मू-काश्मीरमधील पहालगाम येथील दहशतवादी हल्ला आणि दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील दहशतवादी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला होता.

त्याच दिवशी रियाधमध्ये भारत-सौदी अरेबिया 'सुरक्षा कार्यगटा'ची (Security Working Group) तिसरी बैठक पार पडली. ही बैठक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या राजकीय, कॉन्सुलर आणि सुरक्षा सहकार्य समितीच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे सह-अध्यक्षपद परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (दहशतवादविरोधी) विनोद बहाडे आणि सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाचे कायदेशीर व्यवहार व आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महासंचालक अहमद अल-एसा यांनी भूषवले.

दहशतवादाचा करणार एकत्रित मुकाबला 

या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेपलीकडील दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा कडक शब्दांत निषेध केला. विशेषतः २२ एप्रिल २०२५ रोजी पहालगाम येथे झालेला नागरिकांवरील हल्ला आणि १० नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेली दहशतवादी घटना यांचा स्पष्टपणे निषेध नोंदवण्यात आला.

दोन्ही देशांनी सध्या सुरू असलेल्या सुरक्षा सहकार्याचा सर्वसमावेशक आढावा घेतला आणि जागतिक व प्रादेशिक स्तरावर दहशतवादी गटांकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांवर चर्चा केली. तसेच जहालवाद आणि कट्टरतावादाचा मुकाबला करणे, दहशतवादी वित्तपुरवठा (Terror Financing) रोखणे, दहशतवादी जाळ्यांकडून तंत्रज्ञानाचा होणारा गैरवापर थांबवणे आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी व दहशतवाद यांच्यातील संबंध तोडणे या विषयांवर दोन्ही बाजूंनी विचारमंथन केले.

भविष्यातील वाटचाल

द्विपक्षीय कायदेशीर, न्यायिक आणि कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरक्षा कार्यगटाची पुढील बैठक दोन्ही देशांच्या सोयीनुसार भारतात घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

यापूर्वी २२ जानेवारी रोजी परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (दक्षिण) डॉ. नीना मल्होत्रा यांनी भारतातील अरब देशांच्या राजदूतांची भेट घेतली होती. या भेटीत चालू सहकार्य आणि आगामी कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला होता, तसेच विविध क्षेत्रांतील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी प्राधान्य क्षेत्रांची ओळख पटवण्यात आली होती.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter