Salman Khan Bakri Eid 2026 : शेतकरी धनाजीची थेट सलमानला ऑफर!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
साताऱ्याच्या धनाजी विरकर यांची सलमान खानला ऑफर
साताऱ्याच्या धनाजी विरकर यांची सलमान खानला ऑफर

 

भक्ती चाळक

“आम्हाला तर सलमान भाईला पहिल्यापासनंच भिडायचं होतं, म्हणजे कसंही करून त्यांच्याशी संपर्क करायचा होता. पण आम्ही खेड्यापाड्यातली माणसं, तिथं मुंबईत एवढ्या लांब आमची काय डाळ शिजणार…” हे शब्द आहेत साताऱ्याच्या धनाजी विरकर यांचे.  त्यांना मुंबईच्या गॅलक्सी अपार्टमेंटपर्यंत पोहचायचंय.

साताऱ्याच्या माण तालुक्यातील या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याने सलमान खानला दिलेली ऑफर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलीय. त्याचं कारण आहे येणारा बकरी ईदचा सण आणि धनाजी यांचा ‘चांदचा बोकड’.

दरवर्षी बकरी ईदचा सण जवळ आला की देशभरातल्या वेगवेगळ्या बकरा बाजारांमध्ये अनोख्या आणि दुर्मिळ बोकडांची जोरदार चर्चा रंगते. कोणाच्या पाठीवर जन्मतःच अल्ला किंवा मोहम्मद उमटल्याचा दावा केलेला असतो, तर कोणाच्या अंगावर चांद-ताऱ्यांची नैसर्गिक नक्षी असते. अशा अलौकिक प्राण्यांना पाहण्यासाठी बाजारात एकच गर्दी होते. 

हौशी खरेदीदार अशा बोकडांसाठी लाखोंची काय, पार करोडोंची किंमत मोजायला तयार असतात. यंदा हाच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे साताऱ्याचा हा खास बोकड! ‘आवाज-द-व्हॉईस मराठी’शी बोलताना शेतकरी धनाजी विरकर यांनी आपल्या या दुर्मिळ, डोक्यावर हुबेहूब चंद्रकोर असलेल्या बोकडाची कहाणी सांगितली. आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा अगदी मनमोकळेपणाने मांडली.

घरच्या शेळीचं देखणं पिल्लू
हा बोकड धनाजी यांनी कुठल्या बाजारातून किंवा बाहेरून विकत आणलेला नाही. त्यांच्याच गोठ्यातल्या पाळीव शेळीच्या पोटी त्याचा जन्म झालाय. जन्माच्या वेळी तो इतर पिल्लांसारखाच सामान्य वाटत होता. पण जसा जसा तो मोठा होत गेला, तसा तसा त्याच्या कपाळावरचा पांढरा डाग एकदम ठळक आणि हुबेहूब चंद्रकोरीच्या आकाराचा बनत गेला.

“आमच्या घरच्या शेळीलाच अडीच वर्षांपूर्वी हा बोकड झाला होता. कपाळावर चंद्रकोर आहे हे काय आम्हाला सुरुवातीला एवढं जाणवलं नाही. पण जसजसा तो वाढला, तसतसा त्याचा रुबाब कळला की हा साधासुधा बोकड नाही, हा तर चांदचा बोकड आहे.” असं धनाजी म्हणतात. 

बोकडाचं हे देखणेपण आणि त्याच्या डोक्यावरची कुदरती चंद्रकोर पाहून गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या लोकांनी गोठ्यावर गर्दी करायला सुरुवात केली. हा नुसता बोकड नसून एक अद्भूत चमत्कार आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली.

 
यूट्यूबवर बातमी आली अन् मोबाईल खणखणायला लागला
अशा दुर्मिळ बोकडाला ग्रामीण भागात योग्य किंमत मिळाली नसती म्हणून धनाजींनी त्याला मुंबईला नेण्याचं ठरवले. पण साताऱ्याच्या एका छोट्याशा खेड्यातून थेट मुंबई गाठणं आणि तिथे बोकडाची विक्री करणं त्यांच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यासाठी सोपं नव्हतं. लांबचा प्रवास, तिथे राहायची अडचण आणि मुंबईच्या अथांग बाजाराची अपुरी माहिती, यामुळं त्यांनी माघार घेतली.

त्यावर त्यांनी एक नामी युक्ती शोधली. त्यांनी सोशल मीडिया आणि यूट्यूबचा आधार घेण्याचं ठरवलं. धनाजी म्हणतात, “आमच्या गावातल्या छोट्या बाजारात या बोकडाला पाहिजे तशी मागणी येत नव्हती. मुंबईला एवढ्या लांब प्राण्याला घेऊन जाणं आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. म्हणून मग आम्ही त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकायचं ठरवलं. ज्याला मनापासून खरेदी करायची असेल तो थेट फोन करील. अन खरंच सांगतो, व्हिडिओ पडल्यापासनं फोनवर फोन यायला लागलेत.”

यूट्यूबवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. व्हिडिओ पाहताच मुंबई, पुणे, मालेगाव आणि अगदी हैदराबादमधूनही मोठ्या व्यापाऱ्यांचे आणि शौकीन लोकांचे फोन धनाजींना यायला लागले. प्रत्येकाला हा डोक्यावर चंद्रकोर असलेला देखणा बोकड आपल्या घरी न्यायचा होता.

धनाजी सांगतात, “चंद्रकोर असलेल्या बोकडांना ईदच्या वेळी विशेष महत्व असतं. अनेक मुस्लिम बांधव अल्लाकडे मन्नत मागतात. आपला नवस पूर्ण झाला की आपण ईदला चांदच्या बोकडाची कुर्बानी देऊ, असा शब्द देतात. त्यामुळं अशा बोकडांना मोठी मागणी असती.”

१२ लाखांची बोली, पण भाईजानसाठी खास सवलत
तुम्हाला वाटेल एका बोकडाची किंमत खरंच लाखात असेल? पण जब बात ‘चांद के बकरे’ की हो, तो किमतीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघतात. तानाजी यांच्या या अडीच वर्षांच्या बोकडाला खरेदी करण्यासाठी लोकांनी लाखो रुपयांचे आकडे सांगायला सुरुवात केली आहे. पण धनाजींची अपेक्षा थोडी जास्त आहे. तरी भाईजानसाठी ते बोकडाची किंमतदेखील कमी करायला तयार आहेत.

धनाजी म्हणतात, “आमच्या चांदच्या बोकडाला १० ते १२ लाखांपर्यंत किंमत द्यायला लोक तयार आहेत. पण आमची अपेक्षा १५ लाखांपर्यंत आहे. मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ टाकला अन् तो लय व्हायरल झाला. तेव्हा माझ्या मनात आलं जर ही खबर कशीही करून सलमान भाईपर्यंत पोहोचली आणि त्यांनी आमच्याशी संपर्क केला, तर आम्ही पैशाचा अजिबात विचार करणार नाही. थोडं मागेपुढे करून हा बोकड भाईजानलाच द्यायचा आमचा पक्का इरादा आहे.”

होय, धनाजी यांना आपला हा चांदचा बोकड सलमान भाईजानला विकायची तीव्र इच्छा आहे. सलमान जर हा बोकड घेणार असेल तर ते किंमतीत तडजोड करायलादेखील तयार आहेत. 

आजच्या काळात सोशल मीडियाची ताकद एवढी वाढलीय की जग आपोआप जवळ येऊ लागलंय. मग या शेतकऱ्याचा आवाज भाईजानपर्यंत सोशल मीडियातून पोचवता येऊ शकतो. हा व्हिडिओ आणि ही बातमी भाईजानपर्यंत पोहोचली, तर साताऱ्याच्या या शेतकऱ्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. असं झालं तर धनाजींच्या कुटुंबाची ईद आणखीच आनंददायी होईल. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter