अभिनेता आमिर खान आणि गौरी यांच्या विवाहसोहळ्यात राजकारणापासून ते अभिनयापर्यंत दिग्गजांची उपस्थिती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
अभिनेता आमिर खान आणि गौरी यांच्या लग्नातील क्षण
अभिनेता आमिर खान आणि गौरी यांच्या लग्नातील क्षण

 

बॉलिवूडचे 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेते आमिर खान रविवारी त्यांची दीर्घकाळाची जोडीदार गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अत्यंत मोजक्या कुटुंबीय आणि चित्रपटसृष्टीतील जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा छोटेखानी विवाहसोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला.

मुंबईत काल कोसळत असलेल्या मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी आमिर यांच्या लग्नाची जय्यत तयारी नियोजनानुसार सुरू होती. या सोहळ्याला चित्रपटसृष्टी आणि उद्योग जगतातील निवडक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये 'लगान' चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते-कॉमेडियन वीर दास, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

कुटुंबाच्या साक्षीने विवाह नोंदणी
अभिनेत्याच्या पीआर (PR) टीमने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत छायाचित्रावरून हा विवाहसोहळा अत्यंत घरगुती आणि साध्या पद्धतीचा होता हे स्पष्ट होते. या फोटोमध्ये आमिर खान आणि गौरी स्प्रॅट लग्नाच्या अधिकृत दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. यावेळी दोघांच्या अवतीभवती त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. विशेष म्हणजे, गौरी यांचा मुलगा या दांपत्याच्या मध्ये बसलेला दिसत आहे, तर आमिर यांचा मुलगा आझाद हा आमिर यांच्या बाजूला बसल्याचे या चित्रात पाहायला मिळत आहे.

आमिर खान यांचं हे तिसरं लग्न
अभिनेते आमिर खान यांचे हे तिसरे लग्न आहे. त्यांचा पहिला विवाह चित्रपट निर्मात्या रीना दत्ता यांच्याशी १९८६ मध्ये झाला होता, तर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रीना आणि आमिर यांना जुनैद आणि इरा खान ही दोन मुले आहेत.

त्यानंतर २००५ मध्ये आमिर यांनी दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी लग्न केले. २०२१ मध्ये हे दोघे परस्परांच्या संमतीने वेगळे झाले, मात्र ते दोघेही आपला मुलगा आझादचे संगोपन मिळून करत आहेत.

गतवर्षी केली होती नात्याची कबुली
गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये आपल्या ६० व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमिर खान यांनी गौरी स्प्रॅट यांची प्रसारमाध्यमांशी ओळख करून दिली होती. त्यावेळी आपण गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. गौरी स्प्रॅट या मूळच्या बेंगळुरूच्या असून ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे.

या खास विवाहसोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनीही उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.


Latest News