Omar Abdullah Reviews IFFJK 2026: जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जय्यत तयारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला

 

श्रीनगर 

जम्मू-काश्मीरमध्ये आगामी ७ ते १० सप्टेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFJK) तयारीचा मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी आढावा घेतला. या महोत्सवात चित्रपट स्क्रिनिंग, उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी मास्टरक्लासेस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत हँडलवरून देण्यात आली आहे.

या महोत्सवादरम्यान जम्मू-काश्मीरचा समृद्ध वारसा, खाद्यसंस्कृती, हस्तकला, ​​कला प्रकार आणि प्रमुख पर्यटन स्थळे जगभरात प्रभावीपणे मांडली जावीत, असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच IFFJK ला जागतिक फिल्म कॅलेंडरमधील एक वार्षिक सोहळा म्हणून स्थापित करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि विभागांमध्ये अचूक समन्वय राखण्याचे आवाहन त्यांनी केले. महोत्सवाच्या पहिल्याच आवृत्तीला चित्रपट निर्मात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या कार्यक्रमासाठी ११०० हून अधिक एंट्रीज प्राप्त झाल्या आहेत.