मला दिलेलं प्रेम आर्यनलाही द्या - शाहरुख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'बार्ड्स ऑफ बॉलीवूड' या वेबसीरिजच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात शाहरुखने महाराष्ट्राबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी त्याने केवळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या भूमीला नमन केलं नाही, तर त्याचा मुलगा आर्यन खानसाठीही चाहत्यांकडे भावनिक शब्दांत प्रेमाची याचना केली. 

शाहरुखने या सोहळ्यात जमिनीला स्पर्श करून नमस्कार केला आणि म्हणाला, "मी महाराष्ट्र आणि मुंबईच्या या पवित्र भूमीचा मनापासून आभारी आहे. संपूर्ण देशातील जनतेने मला तीन दशकं मनोरंजन करण्याची संधी दिली, ही माझ्यासाठी मोठी संपत्ती आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. कारण याच भूमीवरून माझ्या मुलाने आपल्या कारकिर्दीचा पहिला टप्पा गाठला आहे. प्रत्येक वडिलांसारखंच मलाही अभिमान आणि आनंद वाटतो. आर्यन खूप मेहनती आहे. मी त्याला एवढंच सांगितलं आहे, की बॉक्स ऑफिसवरील आकडे किंवा समीक्षकांचे चांगले रिव्ह्यू हे यश ठरवत नाहीत. खऱ्या यशाची कसोटी म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम." 

याच वेळी शाहरुखने आपल्या चाहत्यांना भावनिक आवाहन करत म्हटलं, "गेल्या ३० वर्षांपासून तुम्ही मला जसं प्रेम दिलं, तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या मुलालाही द्या." आर्यन खान दिग्दर्शित 'बार्ड्स ऑफ बॉलीवूड' ही वेबसीरिज येत्या १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. पहिल्याच प्रोजेक्टमुळे आर्यनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.