येत्या १० वर्षांत स्टार्टअप आणि तंत्रज्ञानात भारताने जगाचे नेतृत्व करावे - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

'स्टार्टअप इंडिया' मोहिमेला एक दशक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतीय उद्योजकांना भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाचा कानमंत्र दिला. भारतीय स्टार्टअप्सनी आता केवळ सेवा क्षेत्रावर अवलंबून न राहता उत्पादन आणि तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करावे. येत्या १० वर्षांत भारताने या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतील आणि भारतीय कंपन्या जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू शकतील.

नवी दिल्लीत आयोजित 'स्टार्टअप इंडिया'च्या १० व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, "आपल्या स्टार्टअप्सनी डिजिटल आणि सेवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता वेळ आली आहे की आपण उत्पादनावर अधिक भर द्यावा. नवीन कल्पनांवर काम करा, समस्या सोडवा. आपल्याला जगात सर्वोत्तम दर्जाची उत्पादने तयार करायची आहेत. पुढील १० वर्षांत भारताने नवीन स्टार्टअप ट्रेंड आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करावे, हेच आपले लक्ष्य असावे.".

एआय आणि तंत्रज्ञानावर विशेष भर 

सध्या अनेक चिनी कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत मोठी मजल मारली असून प्रस्थापित पाश्चात्य कंपन्यांचे वर्चस्व मोडीत काढले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. एआय (AI) क्षेत्रात नवनिर्मिती करणारे देशच भविष्यात आघाडीवर असतील, असे सांगत त्यांनी 'इंडिया एआय मिशन'ची (IndiaAI Mission) माहिती दिली. संगणकीय खर्च कमी करण्यासाठी ३८,००० (अडतीस हजार) हून अधिक जीपीयू (GPUs) उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकार भारतीय सर्व्हरवर विकसित होणाऱ्या स्वदेशी एआयला प्रोत्साहन देत असून सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातही वेगाने काम सुरू आहे.

स्टार्टअप इंडिया

या मोहिमेला क्रांती संबोधत मोदींनी देशातील बदलत्या चित्राचा आढावा घेतला. ते म्हणाले, "२०१४ मध्ये देशात ५०० पेक्षा कमी स्टार्टअप्स होते. आज ही संख्या २ लाखांहून (दोन लाख) अधिक झाली आहे. यात १२५ युनिकॉर्नचा (Unicorns) समावेश असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनली आहे.".

उद्योजकांना जोखीम घेण्यास प्रोत्साहित करताना मोदींनी एक आश्वासक विधान केले. ते म्हणाले, "मी नेहमीच जोखीम घेण्यावर भर दिला आहे. जे काम करायला कोणी तयार नाही आणि जे आधीच्या सरकारांनी टाळले, ते काम मी माझी जबाबदारी म्हणून स्वीकारतो. जर नुकसान झाले तर ते माझे असेल. पण जर फायदा झाला तर तो माझ्या देशातील लाखो कुटुंबांना होईल.".

सरकारची भक्कम आर्थिक मदत 

भांडवलाची अडचण दूर करण्यासाठी सरकारने 'स्टार्टअप इंडिया सीड फंड', 'स्पेस सीड फंड' आणि 'निधी सीड सपोर्ट प्रोग्राम' यांसारख्या योजनांद्वारे २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच उदयोन्मुख (Sunrise) आणि डीप-टेक क्षेत्रांना मदत करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची संशोधन व विकास योजना सुरू करण्यात आली आहे. संरक्षण, अंतराळ आणि ड्रोन यांसारखी क्षेत्रेही आता खासगी स्टार्टअप्ससाठी खुली करण्यात आली आहेत.

महिलांचा मोठा सहभाग 

महिला उद्योजकांचे कौतुक करताना मोदींनी महत्त्वाची आकडेवारी मांडली. देशातील ४५ टक्क्यांहून अधिक स्टार्टअप्समध्ये महिला संचालक किंवा भागीदार आहेत. विशेष म्हणजे, महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप फंडिंगमध्ये भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठी इकोसिस्टम ठरली आहे.