जवळपास सर्वच मोबाईल यूजर्सना दिवसाला किमान एक-दोन स्पॅम कॉल्स आणि मेसेज येतात. यामध्ये मग लोन ऑफर्स, बँक ऑफर्स, एखादी स्कीम सांगणारे किंवा फसवणूक करणारे कॉल्सही असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आता भारताच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) खास 'डू नॉट डिस्टर्ब' (DND) अॅप तयार केलं आहे.
या अॅपच्या मदतीने यूजर्स नकोशा नंबरवरून येणारे फोन कॉल्स आणि मेसेज ब्लॉक करू शकणार आहेत. ट्रायचे सचिव व्ही. रघुनंदन यांनी याबाबत माहिती दिली.
असं वापरा DND अॅप
गुगलच्या प्ले स्टोअरवर DND हे अॅप उपलब्ध आहे. अँड्रॉईड फोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल करा.
यानंतर अॅप उघडून साईन-अप करा. यासाठी ओटीपीची मदत घ्यावी लागेल.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा DND लिस्टमध्ये जोडण्यात येईल. यामुळे तुमच्या नंबरवर स्पॅम कॉल्स येणार नाहीत.
यानंतरही तुम्हाला स्पॅम कॉल्स येत असतील, तर अॅपच्या मदतीने तुम्ही त्याबाबत तक्रार नोंदवू शकता. (Tech News)
अॅपमध्ये आहेत त्रुटी
सध्या या अॅपमध्ये काही त्रुटी असल्याचं देखील रघुनंदन यांनी मान्य केलं आहे. मात्र, ट्राय यावर काम करत असून, लवकरच हे बग्स आणि ग्लिचेस नीट केले जातील असं आश्वासन रघुनंदन यांनी दिलं. ट्रायने यासाठी एका बाह्य एजन्सीला देखील नियुक्त केलं आहे. अँड्रॉईड अॅपमध्ये येणाऱ्या काही समस्यांचे निराकरण देखील झालं आहे. मार्च 2024 पर्यंत हे अॅप अगदी सुरळीतपणे काम करेल अशी खात्री रघुनंदन यांनी दिली.
आयफोनवरही होणार सुरू
सध्या DND अॅप हे आयफोनवर काम करत नाहीये. अॅपलच्या सुरक्षा नियमांमुळे या अॅपला कॉल लॉगचा अॅक्सेस मिळत नाहीये. यासाठी ट्राय अॅपल कंपनीशी बोलणी करत असून, iOS मध्ये लवकरच हे अॅप काम करेल असं सांगण्यात येत आहे.