चीनमध्ये कोरोनाचा नव्या लाटेची शक्यता...

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बीजिंग : संपूर्ण जगात हाहाःकार माजविलेल्या कोरोना विषाणूने चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाची नवी लाट येण्याच्या शक्यता असून तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्या लस संशोधनावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहेत.

 

कोरोनाची जागतिक साथ ही वैश्‍विक आरोग्य आणीबाणी नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केले आहे. मात्र चीनमध्ये कोरोनाचे संक्रमण पुन्हा सुरू झाले आहे. येथे ओमिक्रॉनच्या ‘एक्सबीबी’ या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव एप्रिल महिन्यापासून दिसू लागला आहे. या महिन्याअखेरीस चार कोटी जणांना संसर्ग होण्याची व जूनमध्ये नवी लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

त्यावेळी आठवड्याला सहा कोटी ५० लाख एवढ्या संख्येने रुग्ण वाढण्याची भीती आहे. चीन सरकारने गेल्या वर्षी ‘झिरो कोविड’ धोरण राबविले होते. पण देशांतर्गत दबाव वाढल्याने हे धोरण अचानक मागे घेण्यात आले होते. या काळात विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीला कोरोनाच्या ‘एक्सबीबी’ या प्रकाराने आव्हान निर्माण झाले आहे, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

 

चिनी अधिकृत माध्यमाचा हवाला देत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने चिनी साथरोगतज्ज्ञ चोंग नन्शान यांचे म्हणणे नमूद केले आहे. कुआंगचो येथे जैवतंत्रज्ञान परिसंवादात बोलताना ते म्हणाले, की ओमिक्रॉनच्या ‘एक्सबीबी’ या उपप्रकारासाठी (एक्सबीबी १.९.१, एक्सबीबी १.५ आणि एक्सबीबी १.१६ या प्रकारासह) नव्या लशीला प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. आणखी तीन ते चार लसींना लवकरच मंजुरी मिळेल, असेही त्यांनी सांगितले पण त्याबाबत अधिक माहिती दिली नाही.

 

चीनमध्ये गेल्या वर्षी ‘झिरो कोविड’ धोरण कठोरपणे राबविण्यात येत होते. पण ते अचानक मागे घेतल्याने कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. यामुळे ८५ टक्के नागरिक त्यावेळी आजारी पडले होते.

 

याचाच परिणाम म्हणजे नवीन उद्रेकात आजारी पडणाऱ्यांची संख्या सर्वांत मोठी असू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सध्याची लाट की कमी तीव्रतेची असेल, असा दावा चिनी अधिकारी करीत असले तरी देशातील वृद्धांच्या मृत्यूदरात वाढ टाळण्यासाठी बूस्टर डोसचे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची आणि रुग्णालयांमध्ये प्रतिजैविकांचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.

 

अमेरिकेतही संसर्ग

नव्या विषाणूमुळे अमेरिकेतही संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपल्याचे ११ मे रोजी घोषित करण्यात आले आहे. आगामी वर्षात नव्या प्रकारामुळे नव्या साथीची लाट येण्याची शक्यता विशेषज्ञ नाकारत नाहीत, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

 

विविध तज्ज्ञांची मते...

युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील साथरोगतज्ज्ञ: संसर्गबाधितांची संख्या कमी असेल. गंभीर रुग्णही कमी असतील आणि मृतांची संख्याही कमी असेल, तरीही ती मोठी संख्या असू शकते. ही एक सौम्य लाट आहे, असे जरी आपल्याला वाटत असले तरीही सार्वजनिक आरोग्यावर ती लक्षणीय परिणाम करू शकते.

 

बीजिंग सेंट्रल फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन: एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कोरोना हा फ्लूपेक्षा जास्त संसर्गजन्य रोग ठरला आहे.