दिल्ली बनली 'गॅस चेंबर'! एक्यूआय ४६१ वर; दृश्यमानता कमी झाल्याने जनजीवन ठप्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली होती. यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) प्रचंड कमी झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच हवेची गुणवत्ता 'अतिगंभीर' (Severe-Plus) श्रेणीत पोहोचल्याने नागरिकांना विषारी हवेचा सामना करावा लागत आहे.

खराब हवामान आणि वाढत्या प्रदूषणामुळे विमान प्रवासावरही मोठा परिणाम झाला आहे. इंडिगो एअरलाईन्सने (IndiGo) एक ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी करून प्रवाशांना सावध केले आहे. विमाने उशिरा सुटण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.

विमान कंपन्यांचा इशारा

बदलत्या हवामानामुळे सोमवारी दिल्लीत या हंगामातील पहिले दाट धुके पाहायला मिळाले. याचा परिणाम विमानतळावरील दृश्यमानतेवर झाला आहे.

इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे, "विमानतळावर सध्या दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत. काही विमाने उशिरा सुटू शकतात."

तसेच, धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूकही संथ होऊ शकते. त्यामुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांनी हातात जास्तीचा वेळ ठेवूनच घरातून निघावे, असा सल्ला इंडिगोने दिला आहे. परिस्थितीवर आमचे लक्ष असून सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

एअर इंडियानेही (Air India) प्रवाशांना सूचना दिली आहे. "दाट धुक्यामुळे दिल्ली आणि उत्तर भारतातील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. विमानतळावर निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या विमानाचे स्टेटस तपासावे," असे एअर इंडियाने म्हटले आहे.

दिल्ली बनली गॅस चेंबर

याआधी रविवारी दिल्लीकरांना हवेत पसरलेले विष अक्षरशः डोळ्यांनी दिसत होते. विषारी धुक्याच्या जाड थरामुळे राजधानीचे रूपांतर 'गॅस चेंबर'मध्ये झाले होते. या वर्षी पहिल्यांदाच हवेची गुणवत्ता 'अतिगंभीर' श्रेणीत गेली.

शहराचा २४ तासांचा सरासरी 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) ४६१ वर नोंदवला गेला. डिसेंबर महिन्यातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वाईट स्तर आहे. याआधी २१ डिसेंबर २०१७ रोजी ४६९ हा उच्चांक नोंदवला गेला होता. एप्रिल २०१५ पासून आतापर्यंत डिसेंबरमध्ये फक्त एकदाच अशी परिस्थिती उद्भवली होती. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबरला ४९४ एक्यूआय नोंदवला गेला होता.

प्रदूषण का वाढले?

वातावरणातील आर्द्रता, कमी तापमान आणि वारा शांत असल्याने प्रदूषण जमिनीजवळच अडकून पडले आहे. रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. 'ॲटमॉस्फेरिक इन्व्हर्जन'मुळे (Atmospheric Inversion) परिस्थिती आणखी बिघडली. म्हणजेच जमिनीलगतची थंड हवा वरच्या गरम हवेमुळे अडकून पडली आणि प्रदूषण पसरले नाही.

सोमवारी दुपारनंतर वाऱ्याचा वेग थोडा वाढू शकतो, ज्यामुळे प्रदूषके काही प्रमाणात कमी होतील, असा अंदाज आहे.

तज्ज्ञांचे मत

'सफर' (SAFAR) चे संस्थापक आणि तज्ज्ञ गुफरान बेग म्हणाले, "हे दिल्लीतील स्थानिक प्रदूषणाचे खरे चित्र आहे. वाऱ्याचा वेग नहिवत असल्याने हवा बाहेर जात नाहीये किंवा आत येत नाहीये. अशा स्थितीत बाहेरून येणाऱ्या धुळीचा वाटा नगण्य असतो. हे सर्व प्रदूषण दिल्लीतील स्वतःच्या उत्सर्जनामुळेच झाले आहे."

आकडेवारी धडकी भरवणारी

एकूण ३९ केंद्रांपैकी ३८ ठिकाणी हवा 'गंभीर' श्रेणीत होती. वजीरपूर, रोहिणी आणि अशोक विहार या तीन केंद्रांवर तर प्रदूषण मापक यंत्राने ५०० ची अंतिम मर्यादा गाठली. तर इतर अनेक ठिकाणी आकडा ४९० च्या वर होता.

या हंगामात दिल्लीने ५ वेळा ४०० पेक्षा जास्त एक्यूआय नोंदवला आहे. शनिवारी हवा वेगाने खराब होऊ लागल्याने सकाळी 'ग्रॅप'चा (GRAP) तिसरा टप्पा लागू करण्यात आला. मात्र, सायंकाळपर्यंत सुधारणा न झाल्याने चौथा टप्पाही लागू करावा लागला. सध्या दिल्लीत ग्रॅपचे सर्व टप्पे लागू आहेत.

पुढील काही दिवस दिलासा नाही

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारनंतर वाऱ्याचा वेग थोडा वाढला तरी प्रदूषणातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, १५ ते १७ डिसेंबर दरम्यान हवा 'अतिशय खराब' (Very Poor) श्रेणीत राहू शकते. त्यानंतरचे सहा दिवसही परिस्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, रविवारी सफदरजंग येथे दृश्यमानता २०० मीटरपर्यंत खाली आली होती. कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी पहाटेही दाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.