नुरुल हक
हिंसाचार आणि जातीयवादाचा मुकाबला हिंसेने नाही, तर समन्वयाने करायला हवा. भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला आग, बुलडोझर आणि सर्व प्रकारच्या अन्यायाचा विरोध करावा लागेल. देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावून मदरसा विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्रिपुरातील विशालगड येथील जामिया मदानिया दारुल उलूम मदरशाचे प्राचार्य मौलाना अब्दुर रहमान यांनी हा संदेश दिला.
सोमवारी संपूर्ण त्रिपुरामध्ये सर्व शाळांसोबतच मदरशांमध्येही प्रजासत्ताक दिन अत्यंत आदराने साजरा करण्यात आला. सरकारी, खासगी आणि केंद्रीय निधीतून चालणाऱ्या मदरशांमध्ये शिक्षक, धर्मगुरू आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन आपापल्या परीने देशप्रेम व्यक्त केले. या निमित्ताने अनेक ठिकाणी मदरसा विद्यार्थ्यांनी मिरवणुकाही काढल्या.
विशालगडच्या राऊतखला येथील जामिया मदानिया दारुल उलूम मदरशात विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज आणि तिरंगी रंगाची सजावट केलेले कपडे परिधान करून उत्सवात सहभाग घेतला. मदरसा मैदानात प्राचार्य मौलाना अब्दुर रहमान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि समूहस्वरात राष्ट्रगीत गायले.
यावेळी बोलताना प्राचार्य अब्दुर रहमान म्हणाले की, "१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीमुळे एक शक्तिशाली आणि लोकशाहीवादी भारत निर्माण झाला. राज्यघटना हा भारताचा कणा आहे आणि तिच्यामुळेच जगाच्या नकाशावर देशाला प्रतिष्ठा मिळाली आहे."
ते पुढे म्हणाले की, "जोपर्यंत राज्यघटना सुरक्षित राहील, तोपर्यंतच भारत सुरक्षित आहे. राज्यघटनेवर होणारा हल्ला हा भारताच्या सार्वभौमत्वावर होणारा हल्ला असेल. हे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी आणि भारताची 'विविधतेत एकता' राखण्यासाठी आपल्याला हिंसेचा मुकाबला हिंसेने नाही, तर प्रेम आणि सलोख्याने करावा लागेल."
लोकशाहीच्या रक्षणासाठी मुस्लिमांनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून अन्यायकारक धोरणांचा विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त मौलाना अब्दुर रहमान यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना देशहितासाठी जबाबदार भूमिका बजावण्याचे आवाहन केले. या प्रसंगी काही मदरशांमध्ये देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थनांचे (दुआचे) आयोजनही करण्यात आले होते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -