देशातील १६ पैकी एक महिला लठ्ठ तर पुरुषांचे प्रमाण?

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
लठ्ठपणा- मोठे आव्हान
लठ्ठपणा- मोठे आव्हान

 

मुंबई : मुंबईतील प्रत्येक आठवी व्यक्ती लठ्ठ असल्याचे आढळून आले आहे. या लठ्ठपणामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. महापालिका आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘संयुक्त स्टेप सर्व्हे’मध्ये ही बाब समोर आली आहे. लठ्ठपणाचे कारण तंदुरुस्तीकडे लक्ष न देणे आणि कमी आहार घेणे हे असे असल्याचे सांगितले जात आहे.
 
मुंबईतील असंसर्गजन्य आजारांचे पुरावे जाणून घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण जागतिक आरोग्य संघटना आणि महापालिका यांच्या वतीने केले आहे. या सर्वेक्षणात इतर आजारांसोबतच मुंबईकरांना लठ्ठपणाचाही त्रास होत असल्याचे समोर येत आहे.

१५ टक्के महिला लठ्ठ
सर्वेक्षणात समाविष्ट पाच हजार १९९ सहभागींपैकी प्रत्येक आठवी व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणानुसार पुरुषांपेक्षा महिला अधिक लठ्ठ असल्याचे आढळून आले. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ टक्के महिला लठ्ठ आहेत, तर पुरुषांची संख्या नऊ टक्के आहे.
 
मोठे आव्हान
लठ्ठपणा हे सार्वजनिक आरोग्याच्या सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून वेगाने उदयास येत आहे. याचा थेट संबंध मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच वंध्यत्वाच्या समस्यांसारख्या जोखीम घटकांशी आहे. पालिकेच्या संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या, की नागरिकांनी निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पौष्टिक आहारासोबतच तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे.

 

 या समस्येविषयी डॉ. पवनकुमार पीपडा, हृदयरोग शल्यचिकित्सक‘ यांनी सांगितले की, ओपीडी’त हृदयाशी संबंधित आजारांसाठी येणाऱ्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण लठ्ठपणाने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यांचा ‘बॉडी मास इंडेक्स’ निर्धारित मानकांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. अशा रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
 
राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार...
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, २०१९ आणि २०२१ मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या फेरीनुसार, देशातील १६ पैकी एक महिला आणि २५ पैकी एक पुरुष लठ्ठ आहे. ‘एनएफएचएस’ पाचव्या फेरीत असेही आढळून आले की १५ ते ४९ वयोगटातील सुमारे ६.४ टक्के महिला आणि ४ टक्के पुरुष लठ्ठ आहेत.