बकरी ईद : देशभरातील नेत्यांनी दिला सौहार्द, शांतीचा संदेश

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 11 h ago
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू

 

बकरी ईदच्या शुभप्रसंगी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह अनेक नेत्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. या सणाच्या निमित्ताने त्याग, विश्वास आणि सौहार्दाचा संदेश देत शांतता आणि समृद्धीची कामना त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, “बकरी ईदच्या शुभेच्छा. हा प्रसंग समाजात सौहार्द आणि शांतीचे नाते मजबूत करेल. सर्वांना चांगलं आरोग्य आणि समृद्धी लाभो” . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभकामना देताना समाज आणि देशासाठी समर्पणाच्या भावनेने कार्य करण्याचा संकल्प करावा, असं आवाहन केलं. “ईद-उज-जुहाच्या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. हा सण त्याग, विश्वास आणि उच्च आदर्शांचं महत्त्व सांगतो. आपण सर्वांनी समर्पणाच्या भावनेने कार्य करण्याचा संकल्प करूया,” असं त्यांनी नमूद केलं .

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बकरी ईदच्या निमित्ताने नि:स्वार्थ त्याग, विश्वास आणि क्षमेच्या मूल्यांचा उल्लेख केला. “बकरी ईद नि:स्वार्थ त्याग, विश्वास आणि क्षमेच्या उच्च मूल्यांचा उत्सव आहे. हा आनंदाचा प्रसंग साजरा करताना आपण शांत, सौहार्दपूर्ण आणि न्याय्य समाजासाठी एकत्र येऊ. ईद मुबारक!” असं त्यांनी सांगितलं . काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनीही शुभेच्छा दिल्या. “सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा! या आनंदाच्या प्रसंगी प्रत्येक घरात प्रेम, शांती आणि समृद्धी नांदो. सर्वांना सुख, आशीर्वाद आणि बंधुभावाची भावना लाभो,” असं त्यांनी नमूद केलं.

तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लिम समुदायाला बकरी ईदच्या शुभेच्छा देताना सणाचा संदेश अधोरेखित केला. “हजरत इब्राहिम यांनी अल्लाच्या आज्ञेनुसार आपल्या मुलाचा बळी देण्याची तयारी दाखवली, त्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा होतो. माणसाने योग्य मार्गाने आनंदी जीवन जगावं, आव्हानांना घाबरू नये आणि दानधर्माला महत्त्व द्यावं, असा संदेश हा सण देतो,” असं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मुस्लिम समुदायाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. “बकरी ईदच्या शुभेच्छा! सर्व मुस्लिम बांधवांना या प्रसंगी हार्दिक शुभकामना,” असं त्यांनी सांगितलं . 

बकरी ईद हा इस्लाममधील प्रमुख सण आहे. हजरत इब्राहिम यांनी अल्लाच्या आज्ञेनुसार आपल्या मुलाचा बळी देण्याची तयारी दाखवल्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा होतो. नमाज, दानधर्म आणि प्राण्यांचा प्रतीकात्मक बळी यातून त्याग आणि सहानुभूतीचा संदेश या सणानिमित्त दिला जातो.