मालेगावात ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक शांततेत व उत्साहात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
मालेगाव : मुस्लीम बांधवांकडून काढण्यात आलेली ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणुक.
मालेगाव : मुस्लीम बांधवांकडून काढण्यात आलेली ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणुक.

 

मालेगाव : "जगात कोणताही धर्म वैर व द्वेषाची शिकवण देत नाही. जगात शांतता नांदावी यासाठी सर्व धर्म, समाज घटकांनी सहकार्य करणे आवश्‍यक आहे. एकोपा, सलोखा व भाईचारा कायम राहण्यासाठी हिंदू-मुस्लीम बांधवांसह सर्व धर्माच्या नागरिकांनी एकमेकांना समजून घेत प्रेमाने रहावे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ऐवजी शुक्रवारी मिरवणूक काढून हा संदेश अंमलात आणला आहे," असे मत उत्तर प्रदेश देवासशरीफ येथील मौलाना सय्यद फारुक मिया चिस्ती यांनी ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले. मालेगावात शुक्रवारी (ता. २९) ईद-ए-मिलादची मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. एटीटी विद्यालयाच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.

इस्लामपूरा भागातील सुन्नीया हनफिया मदरस्या जवळून सकाळी आठ वाजता मिरवणूकीला सुरवात झाली. दुपारी दोनच्या सुमारास मिरवणूक संपली. तब्बल सहा तास ही मिरवणूक सुरु होती. अकोला येथील मौलाना सैय्यद जकी मिया, मौलाना सय्यद फारुक मिया चिस्ती यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. इमाम अहमद रजा रोड, आग्रा रोड, मिर्झा गालीब रोड, मोमीन पूरा, मोहम्मद अली रोड, किदवाइ रोड, इस्लामपूरा, मुशावरत चौक, नयापूरा या मार्गाने एटीटी शाळेत मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूकीत बालगोपाळांसह नागरीक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. याशिवाय सजविलेले रथ, चारचाकी वाहने, दुचाकी व विविध विभागातील तीनचाकी ट्रॉलींचा गटगटातील तरुणांचा मिरवणुकीत सहभाग होता. ईद-ए-मिलादची ही १०४ वी मिरवणूक होती. 

शहरात दोन दिवस सर्व यंत्रमाग बंद असल्याने मिरवणूकीत गर्दी उसळली होती. मिरवणूक मार्गावर विविध भागात प्रमूख मौलाना सैय्यद जकी मिया व येथील मुफ्ती वाहीद अली, मुफ्ती नईम मिस्बाही, मौलाना अहमद रजा अझहरी, मुफ्ती मुद्दसीर अझहरी याच्यासह प्रमुख मौलानांचे पुष्पहार अर्पण करुन स्वागत करण्यात आले. 

जिल्हाधिकारी, एसही सहभागी   
मिरवणुकीत सहभागी नागरिकांनी हातात विविध रंगी झेंडे घेत घोषणा दिल्या. तरुण धार्मिक गीत गायन करीत होते. मुख्य मिरवणुकीची शुक्रवारीची नमाज असल्याने दुपारी दीडला एटीटी विद्यालयाच्या प्रांगणात सांगता झाली. समारोप समारंभात जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप सहभागी झाले होते. यावेळी मौलाना सय्यद जकीमिया म्हणाले, "आजचा दिवस हा पुर्ण जगाच्या शांततेसाठी आहे. अरबमध्ये मुलींना जिवंत दफन केले जायचे. हे बघून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मुलींना समाजात स्थान दिले." यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाचेही आभार मानले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांना सरबत, चॉकलेट, पाणी, खाद्यपदार्थ, प्रसाद (न्याज) वाटप करण्यात आले. विविध भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा मोठा व्यवसाय झाला. मिरवणूक यशस्वीतेसाठी मुक्ती वाजीद यार अली, मौलाना अहमद रझा अझहरी, युसूफ इलियास, नईम रझा, कारी जैनुल आब्दीन आदींसह सुन्नी जमेतुल उलेमाच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.

शहरात शुक्रवारची नमाज उशिरा
मालेगाव शहरात जुम्माच्या नमाजला मोठे महत्व आहे. शहरातील मुस्लीम बांधव सहसा जुम्माची नमाज टाळत नाही. मिरवणुकीला मोठा विलंब झाल्याने प्रथमच जुम्माची नमाज उशिरा पढली गेली. शहरातील विविध मशिदीत शेवटची जुम्मा नमाज पाऊणेतीनला पार पडली. तीन किलोमीटरहून अधिक मिरवणूक असल्याने या दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चंदनपुरी गेट भागात राष्ट्रीय एकात्मता समिती व हिंदू बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत केले.

- जलील शेख, मालेगाव  
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube