नाशिक : अनंत चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी गुरुवार(ता.२८) नाशिककरांकडून साजरे करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, आका की आमद मरहबा सुरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. नागरिक आणि पोलीस तसेच जिल्हा प्रशासनासाठी ऐतिहासिक दिवस ठरला.
अमन आणि शांतीचे शहर म्हणून शहराची ओळख कायम राहिली आहे. गुरुवार (ता.२८) रोजी गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद दोन्ही पवित्र सण एका दिवशी आले. शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी नेहमीप्रमाणे धार्मिक आणि जातीय सामाजिक सलोखा कायम राखत दोन्ही सण उत्साहात साजरे केले. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना दुपारची जोहरची नमाजसाठी अजान सुरू होताच नाशिकचा राजा गणेश मंडळांसह अन्य मंडळांनी आपले ढोल पथक तसेच डीजे दोन मिनिटांसाठी बंद केले. अजान समताच त्यांनी पुन्हा वाजंत्री सुरू करत पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. तर मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये. यासाठी दूध बाजार येथील हेलबावडी मशीदचे दर्शनी प्रवेशद्वार मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवले. मागीलद नमाजीसाठी उघडे करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दूध बाजार येथे पोलीस प्रशासनाचे शांतता समिती स्वागत कक्षात अनेक मुस्लिम बांधवांनी सहभागी होत गणेश मंडळांचे स्वागत केले. मिरवणूक प्रारंभ करताना देखील मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावत धार्मिक सलोख्याचा संदेश दिला. दुसरीकडे मिरवणुकीच्या दोन्ही बाजूस मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहत मिरवणुकीचा आनंद घेतला. मिरवणुकीत सहभागी बांधवांना कुठल्या समस्या आल्यास त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. इतकेच नाही तर हिंदू मुस्लिम तरुण मित्र एकमेकांना शुभेच्छा देताना आढळून आले.
दुसरीकडे अनंत चतुर्थी मिरवणूकनिमित्ताने गणपती बाप्पा मोरया तर ईद-ए-मिलादनिमित्ताने आका की आमद मरहबा सुरा, अल्लाहू अकबर सुरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सलोख्याचे दिसून आलेले विविध दृश्यांनी धार्मिक सामाजिक आणि सलोख्यात दर्शन घडले. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांकडून धार्मिक सलोख्याचा संदेश दिला.
त्याचप्रमाणे बोहरी समाजाच्या सेफिया फाउंडेशननेही आपले वैद्यकीय सुरक्षा रक्षक तसेच वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले. इतकेच नाही तर गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात येणारा जुलूस दोघांचे भव्य स्वरूप असल्याने चेंगराचेंगरी होऊ नये. जुलूस किंवा विसर्जन मिरवणुकीस त्रास होऊ नये. यासाठी मुस्लिम बांधवांनी विसर्जनाच्या दिवशी केवळ धार्मिक कार्यक्रमांनी ईद-ए-मिलाद साध्या पद्धतीने साजरी केली. तर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवार (ता.२९) रोजी जुलूस काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय आदर्श ठरला.
युनुस शेख/ नाशिक