मिष्टान्न - इतिहास आणि संस्कृती

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 2 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

विष्णू मनोहर 
 
भोजन म्हणजेच जेवण, हे सर्व प्रकारच्या चवींचे मिश्रण असले पाहिजे. जेवणाचा शेवट हा गोड असावा, म्हणजेच गोड पदार्थ जेवणात समाविष्ट नसल्यास ते परिपूर्ण जेवण मानले जात नाही. म्हणून गोड पदार्थाला जेवणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर आज आपण मिष्टान्नाबाबत म्हणजेच मिठाईबाबत थोडी चर्चा करू.
 
मागे काही दिवसांपूर्वी अब्दुल हलील शरर यांचा एक लेख वाचण्यात आला. हे मूळचे लखनौचे. 'अवध अखबार' या वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी म्हणून काही काळ ते हैदराबादलाही होते. त्याकाळी म्हणजे १८८० ते १८९० या दरम्यान 'दिलचस्प' नावाची त्यांची कादंबरी भरपूर गाजली. हैदराबाद आणि लखनौ या दोन्हीही ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते आणि मुख्य म्हणजे ही दोन्हीही शहरे खाण्यासाठी व खवय्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत, हे सर्वश्रुतच आहे.
 
तर या अब्दुल साहेबांच्या एका लेखात त्यांनी म्हटले होते की, 'मिष्टान्न किंवा मिठाई तयार करणे, हे हिंदू हलवायांचे काम आहे. त्याकाळी मिठाई बनवण्याबाबत मुस्लिम हलवायांचा दर्जाही उच्च मानला जायचा. हे लोक सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते. ते काम हिंदू हलवाईच करत. परंतु मुसलमान हलवाई खास श्रीमंत लोकांसाठी व अभिरुचिसंपन्न सरदारांसाठी जी मिठाई तयार करत होते, ती अत्यंत स्वादिष्ट व वेगळी असे.'

त्याकाळची लखनौची खासियत अशी होती की, इथे दोन प्रकारचे हलवाई असत. मुस्लिम हलवाई आणि हिंदू हलवाई. मुस्लिम हलवायांची खासियत अशी की, सामान्य प्रतीची मिठाई त्यांच्याकडून करवून घेतली, तर ती चांगली मिळत नसे. परंतु मुद्दाम सांगून विशिष्ट प्रकारची मिठाई बनवून घेतली, तर ती हिंदू हलवायांच्या मिठाईपेक्षा अधिक चांगली व स्वादिष्ट असे. लखनौत सामान्यांप्रमाणे जिलेबी, इमरती आणि बालूशाही इत्यादी वस्तू फार उत्तम मिळतात व आता तर प्रत्येक पदार्थासाठी एक एक गल्ली म्हणजेच लेन तयार झालेली आहे. यात प्रत्येकी ६० ते ७० दुकाने आहेत.

हिंदुस्थानी मूळची मिठाई कोणती आणि मुस्लिमांनी आपल्याबरोबर आणलेले मिठाईचे पदार्थ कोणते, असे भेद मिष्टान्नाच्या बाबतीत निर्माण झाले. परंतु, त्यांच्या स्वादावरून अनुमान करायचं झालं तर हलवा हा पदार्थ खास अरबी आहे. इतिहास तसे सांगतो. अरबस्थानातून आणि इराणातून हा पदार्थ हिंदुस्थानात आला आणि येताना आपले नावही बरोबर घेऊन आला. परंतु हे म्हणणेदेखील निर्विवाद नाही. त्यातही बरेच मतभेद आहेत.
 
जो हलवा सामान्यतः सर्व हलवायांकडे मिळतो आणि पुरीबरोबर खाल्ला जातो, तो पदार्थ शुद्ध हिंदूंचा आहे, असे म्हणता येईल. तुम्ही पाहिले असेल, उत्तर हिंदुस्थानात 'हलवा पुडी' खाण्याची प्रथा आहे. फार पूर्वी त्याला 'मोहनभोग' असेही म्हणत. परंतु 'सोहन हलवा' ही मिठाई मात्र मुस्लिम पद्धतीची आहे.

जिलेबीला अरबी भाषेत 'जलबियां' म्हणतात. तसेच, बलुचिस्तान, कजाकिस्तान, पाकिस्तानात याला जलेबासुद्धा म्हणतात. यावरून असे स्पष्ट दिसते की जलबियां या शब्दाचाच जिलेबी हा अपभ्रंश आहे. याकरिता हा पदार्थ अरबी मिष्टान्नांत समाविष्ट केला पाहिजे. सध्या आपल्या महाराष्ट्रीय जेवणामध्ये, खास करून लग्नाच्या पंगतीमध्ये जिलेबीशिवाय पान हलत नाही.
 
मी पदार्थांच्या शोधात असेच भटकत असताना मला असे दिसले की, जिलबी ज्या पिठाची बनवतात, तसेच आंबलेले पीठ व सफरचंद वापरून पाश्‍चात्य देशात याचे एक सुंदर प्रकारचे डेझर्ट (मिष्टान्न) तयार करतात. पण शंभर वर्षे जुने लक्ष्मीबाई धुरंदर यांनी लिहिलेले मराठी पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यातही अशाप्रकारचा उल्लेख होतो. 

पेढा ही शुद्ध हिंदी मिठाई आहे. इमरतीदेखील हिंदीच आहे. परंतु, ही दक्षिणेतून आलेली आहे. दक्षिणेत उडदाच्या डाळीचा समावेश जास्तीत जास्त पदार्थात केलेला असतो, हे आपल्याला माहीत आहेच. काही लोक म्हणतात, की इमरती ही लखनौची निर्मिती आहे. हा परत शोधाचा विषय आहे. परंतु या मिठाईच्याबाबतीत लखनौचं काही निराळं वैशिष्ट्य नजरेस येत नाही. भारतातील इतर शहरांइतकीच लखनौची या क्षेत्रात प्रसिद्धी आहे. परंतु, एक गोष्ट थोडी विचित्र दिसते, ती अशी की लखनौ शहरात आग्रा आणि पंजाबचे हलवाई विशेष प्रसिद्ध आहेत व आता तर त्यांच्या कित्येक पिढ्या इथे स्थायिक झालेल्या आहेत, तर त्यांना आपण लखनौच्या बाहेरचे आहेत, असे कसे म्हणू शकतो? इतर शहरांत मात्र लखनौ, दिल्ली, मेरठ, पेशावर, राजस्थान व कोलकाता त्यांच्या आसपासचे हलवाई अधिक प्रसिद्ध आहेत, असं मला आढळून आले.

आजकालच्या या फास्टफुडच्या दुनियेत व कॅलरी कॉन्शस मंडळींमुळे मिठाई किंवा गोड पदार्थ विशिष्ट समाजच खातो किंवा कमी खातो, असे म्हणता येणार नाही. थोडक्‍यात, याचेसुद्धा ग्लोबलाझेशन झालेले आहे. पण जुन्या काळी असे समजले जायचे की एखाद्या जमातीचे, समजा मुस्लिम समाजातील लोक मांस खात असल्यामुळे त्यांना तिखट पदार्थात अधिक गोडी असावी. याउलट हिंदू लोकांत मिष्टान्नाचे रसिक अधिक आढळत असत. नुसत्या मिठाईनंच हे लोक पोटभर जेवण करायचे.
 
हिंदुस्थानी लोकांना मिष्टान्नांची आवड असल्याकारणानेच हिंदू लोकांची तीर्थस्थाने असलेली मथुरा, बनारस, इंदूर, गुजरातेतील मोठा अंबाजी, तसेच राजस्थानातील श्रीनाथजी व अयोध्या ही शहरं विविध प्रकारच्या स्वादिष्ट मिठाईसाठी इतर शहरांपेक्षा अधिक प्रसिद्ध झाली आहेत. 

सोहन हलवा तयार करण्याच्या बाबतीत मुस्लिम हलवायांइतकाच इतर लोकांनीही लौकिक मिळवला आहे. अखेरच्या काळात, इथले नामांकित सुलेखक 'मुंशी हादी अलीसाहेब' यांनी त्याकाळी बरीच प्रसिद्धी मिळवली. ते एक शेर रव्यामध्ये (त्याकाळी रव्याला 'समनक' असे म्हणत) तीस शेर तूप खपवीत आणि त्याच्या वड्यांवर तऱ्हेतऱ्हेची सुंदर वेलबुट्टी काढीत. त्यावरून सोहन हलवा बनवण्याच्या कौशल्याबरोबर त्यांची सुलेखनातली आणि नक्षीकामातील कलात्मकताही प्रकट होत होती, हे विशेष.

- विष्णू मनोहर