-प्रमोद जोशी
आवाज मराठी'वर सौहार्दाच्या कहाण्यांसोबतच दर आठवड्याला एका महत्त्वाच्या विषयाचे विविधांगी वेध घेणारे लेखन प्रसिद्ध केले जाणार आहे. या आठवड्यात 'भारतातील मुस्लीमांचे आणि इस्लामचे वैशिष्ट्य' या विषयाशी संबंधित लेख प्रसिद्ध केले जात आहेत. भारतीय मुस्लिमांचा या देशाशी असलेल्या सहसंबंधाचा धावता आढावा घेणारा हा लेख...
ही घटना नोव्हेंबर २००३ ची असेल. जॉर्ज बुश (ज्युनियर) त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. लोकशाहीशी संबंधित अमेरिकेतील एका विशेष कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. या भाषणात त्यांनी भारतातील लोकशाही आणि भारतीय समाजात झिरपलेल्या सर्वधर्मसमभावाचे विशेष कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, ‘भारताने लोकशाहीवादी आणि बहुधर्मीय समाज निर्माण करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. विशेष म्हणजे, इस्लाम-लोकशाही हे गुण्यागोविंदाने राहू शकतात हे भारतीय मुस्लिमांनी जगाला सिद्ध करून दाखवले आहे.’ अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या जाळ्यामध्ये एकही भारतीय मुस्लिम अडकला नाही, असे गौरवोद्गारही बुश यांनी यावेळी काढले होते.
बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात प्रकरणानंतर भारतीय मुस्लिमांना भडकवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र संयमी भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांनी चिथावणीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
१९८० च्या दशकातही अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याविरूद्धच्या 'मुजाहिदीन'च्या (धर्मरक्षकांच्या) तथाकथित ‘धर्मयुद्धामध्ये (जिहादमध्ये) सामील झालेल्या भारतीय मुस्लिमांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच होती. म्हणजे या अमिषालाही भारतीय मुस्लीम बळी पडले नाहीत.
आज परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. भारतीय संस्कृती आणि लोकशाहीत मुस्लिमांची भूमिका हा विषय अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. मात्र भारतीय मुस्लिमांनी वेळोवेळी घेतलेल्या सकारात्मक भूमिका पाहिल्या तर त्यातून अनेक रंजक गोष्टी समोर येतात.
जागतिक युद्धापासून दूर
भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या इंडोनेशिया आणि पाकिस्तान या मुस्लीम बहुल देशांइतकीच आहे. पश्चिमी देशांतील, आशियातील अनेक मुस्लीम परदेशातील धर्मयुद्धांत लढताना दिसतात. यामध्ये भारतीय मुस्लिमांची संख्या नगण्य आहे. मुस्लीम लोकसंख्या कमी असूनही या इतर राष्ट्रांतून भर्ती होणाऱ्यांचे प्रमाण मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत जगात दोन किंवा तीन क्रमांकावर असणाऱ्या भारतापेक्षा कितीतरी अधिक आहे.
भारतीय मुस्लिम जगभर फोफावलेल्या इस्लामिक दहशतवादाचा धिक्कार करतात. जगभरच्या दहशदवादी संघटनांना भारतातून मिळणारा नगण्य प्रतिसाद याचा पुरावाच आहे. भारतीय मुस्लिमांच्या नकाराचे मूळ भारतीय समाज आणि संस्कृतीत सापडते. भारताची फाळणी इस्लामच्या आधारे झाली असली तरी आजही पाकिस्तानात जेवढे मुस्लिम नागरिक आहेत, तेवढेच भारतात वास्तव्यास आहेत. म्हणजे वेगळे मुस्लीम राष्ट्र अस्तित्वात आल्यानंतरही बहुसंख्य मुस्लिमांनी भारतातच राहणे पसंत केले.
मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांच्याकडून देशभक्तीचा दाखला मागण्याची अजिबात गरज नाही. अशी कोणती सांस्कृतिक,भावनिक आणि मानसिक कारणे आहेत ज्यामुळे या देशाशी भारतीय मुस्लीमांची नाळ घट्टपणे जोडली गेली आहे, याचा सखोल विचार दहशतवादविरोधी रणनीती बनवणार्यांनी गांभीर्याने केला पाहिजे.
मूलतत्त्ववादी घटक
वर उल्लेखलेल्या कारणांमुळे भारतीय मुस्लिम गुणगौरवास नक्कीच पात्र आहेत. मात्र त्यांच्यातही काही जहालमतवादी आणि मूलतत्त्ववादी घटक आहेत. सुखावणारी बाब म्हणजे त्यांची संख्या फारच मर्यादित आहे. ‘ग्लोबल जिहाद’साठी जगभरातले अनेक मुस्लीम कंबर कसत असताना भारतीय मुस्लिम मात्र त्यापासून दूर आहेत. अतेरिकी भूमिका घेणारे उपद्रवी लोक प्रत्येक समाजात कार्यरत असतात. ते त्यांची भूमिका आततायीपणे मांडतातही. मात्र देशाची मजबूत न्यायव्यवस्था आणि येथील सुज्ञ नागरिक या अरेरावीपणाला वेळीच आळा घालण्यास सक्षम आहे.
विविधेत एकता
भारतीय मुस्लिमांनी आपल्या देशाची विवधतेची संस्कृती आत्मसात केली आहे. शकील बदायुनी यांनी लिहिलेले 'मन तडपत हरी दर्शन को आज' हे गाणे मोहम्मद रफी तितक्यात आर्त स्वरात होऊन गातात, नौशाद या गाण्याला संगीतबद्ध करतात आणि श्रोता तितकाच तल्लीन होऊन ते गाणे ऐकतो. तिघांचा धर्म त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. हे केवळ भारतातच शक्य होऊ शकते. महाभारतासारख्या लोकप्रिय धार्मिक मालिकेचे संवाद राही मासूम यांनी लिहिले. जयासी, रसखान यांसारखे महान कवी आपला सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान राहिले आहेत.
स्वतंत्रता आंदोलन
'ब्रिटिश भारत छोडो' आणि 'सायमन गो बॅक' यांसारख्या लोकप्रिय घोषणांचे जनक युसूफ मेहेरअली होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी स्वीकारलेले 'जय हिंद' हे राष्ट्रीय संबोधन जैन-उल-अबिदिन हसन या आझाद हिंद सेनेच्या कमांडरची निर्मिती होती. 'इन्कलाब झिंदाबाद' ही देशातील सर्वांत लोकप्रिय घोषणा मौलाना हसरत मोहनी यांनी दिली.
भारताच्या राष्ट्रीय चळवळीतील मुस्लिमांची भूमिका सर्वश्रुत आहे. ती नव्याने अधोरेखित करण्याची गरज नाही. १८५७ चा पहिला स्वातंत्र्यलढा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र लढला गेला हे आपण जाणतोच.
१८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दोनच वर्षांत मुंबईचे बद्रुद्दीन तैयबजी पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांचे बंधू कमरुद्दीन तैयबजी यांचाही चळवळीत मोठा सहभाग होता. राष्ट्रवादी मुस्लिमांची ही परंपरा मौलाना आझाद, एमसी छागला, हुमायून कबीर, झाकीर हुसेन, फखरुद्दीन अली अहमद ते एपीजे अबुल कलाम यांच्यापर्यंत येऊन थांबते. केवळ नेतेच नाही, तर बहुसंख्य मुस्लिमांचाही राष्ट्रीय चळवळीत मोठा आणि महत्त्वाचा सहभाग होता.
खेळ आणि संस्कृती
क्रीडा आणि सांस्कृतिक जीवनात मुस्लिमांचा सहभाग नेत्रदीपक राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९३२ मध्ये पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात भारताच्या चमूत मोहम्मद निसार, वजीर अली, नाझीर अली आणि जहांगीर खान यांचा समावेश होता.
पुढे इफ्तिखार पतौडी, मन्सूर अली खान पतौडी, गुलाम अहमद आणि मुहम्मद अझरुद्दीन यांनाही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. याशिवाय मुश्ताक अली, सलीम दुर्रानी, अब्बास अली बेग, सय्यद किरमानी, झहीर खान, मोहम्मद कैफ, मोहम्मद शमी आणि इरफान पठाण यांसारख्या अनेक खेळाडूंनी आपल्या दर्जेदार खेळातून सर्वांचीच मने जिंकली.
हिंदी चित्रपटसृष्टीत तर दिलीप कुमार, मधुबाला, मीना कुमारी, नौशाद, गुलाम अली खय्याम यांच्यापासून ते नसीरुद्दीन शाह, आमिर, शाहरुख, सलमान खान अशा किती तरी मुस्लिम कलाकारांनी योगदान दिले आहे. मुस्लिमांनी हे योगदान कलेच्या प्रत्येक क्षेत्रात आहे.
देशभक्ती
इस्लामचा दृष्टीकोन आंतरराष्ट्रीय असला देवबंदी आणि बरेलवी या भारतीय मुस्लिमांमधील विचारधारा अस्सल स्वदेशी आहे. शिवाय जमात-इस्लामी आणि तबलीगी जमात इत्यादी संघटना भारतीय वातावरणात भरभराटीला आल्या आणि येथेच विकसित झाल्या. त्यांत भारताची छबी पावलोपावली दिसते.
जानेवारी १९३७ मध्ये मौलाना हुसेन अहमद मदनी यांनी दिल्लीतील एका मेळाव्यात म्हणाले, ‘देशाच्या वैविध्यातून राष्ट्रवाद निर्माण होतो.’ राष्ट्रवादाला इक्बालने इस्लामविरोधी म्हटले होते. इक्बाल आणि हुसेन अहमद मदनी यांच्यातील वादावरून असे दिसून येते की भारतातील मुस्लिमांमध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्यातील संबंधांवर जोरदार वादविवादाचा इतिहास राहिला आहे.
आधुनिक दृष्टीकोन
एकोणिसाव्या शतकात सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारण्याचे सुचवले. त्यांनी निर्माण केलेल्या अलिगढ विद्यापीठात मोठ्या संख्येने मुस्लिम विद्वान निर्माण झाले.
इक्बालने १९०१-१९०५ च्या दरम्यान रचलेल्या रचनांनमध्ये 'सारे जहाँ से अच्छा' आणि 'नया शिवाला' यासह अनेक रचना भारतीय राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. एके ठिकाणी ते लिहितात, ‘ माझ्या देशाचा प्रत्येक भाग देवता आहे, हे मला दगडाच्या मूर्तींमध्ये समजले आहे.'
फाळणी आणि तिचा प्रभाव
भारतातील मुस्लिमांची स्थिती आणि राष्ट्र-राज्यातील त्यांची भूमिका फाळणीनंतर पुन्हा एकदा चिंतनाचा विषय बनला, जो आजतागायत सुरूच आहे. फाळणी ही चूक होती असे मानणारा एक मोठा वर्ग या समाजात आहे. विशेषतः भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्यांचे मत विचारात घेतले तर मोठ्या प्रमाणावर या वाक्याची प्रचीती येते. जे झाले ते झाले, आपण अजूनही एकत्र राहू शकतो, असा आशावादही अनेकजण व्यक्त करताना दिसतात. साठच्या दशकात 'मुघल-आझम' चित्रपट पाहण्यासाठी लोक लाहोरहून अमृतसरला सायकलने येत असत, हा इतिहास काही फार जुना नाही.
मात्र १९६५ च्या पाकिस्तानी लष्कराच्या 'ऑपरेशन जिब्राल्टर'ने संपूर्ण चित्रच बदलून टाकले. आणि आज दोन्ही देशांच्या क्लिष्ट आणि अवघड व्हिसा प्रक्रियेमुळे एकमेकांना भेटणेही कठीण होऊन बसले.
वास्तविक, भारत आणि पाकिस्तान हे शेजारील दोन वेगळे देश आहेत आणि दोघांमध्ये चांगले शेजारसंबंध ठेवण्याची नितांत गरज आहे. दोन्ही देशांमध्ये रोटी-बेटी व्यवहारही चालतो. मात्र दोन्ही देशांमधील संबंध ताणले जातात तेव्हा ही कुटुंबे सर्वाधिक दुखावली जातात.
नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. या वास्तूमध्ये 'अखंड भारत' नावाचे भित्तिचित्र आहे. याबाबत पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे निषेध व्यक्त केला असला तरी 'अखंड भारत' ही सांस्कृतिक संकल्पना आहे. पाकिस्तानच्या राजकीय नकाशात तक्षशिलाची उपस्थिती हा देखील एक सांस्कृतिक संदर्भ आहे. पाकिस्तानातील अनेक विद्वान जुन्या इतिहासाशी, म्हणजे भारतीय संस्कृतीशी स्वतःला जोडतात हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
भारतीय मन
२०१५ मध्ये इराकपासून सीरियापर्यंत ‘आयसीस’ची दहशत होती. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या तेव्हा १८ कोटीच्या जवळपास होती. मात्र आयसीसमुळे प्रभावित झालेल्यांची संख्या नगण्य होती. १०० पेक्षा कमी मुस्लीम या संघटनेपासून प्रेरित होऊन एकत्रितपणे आयसीसच्या भागात जाण्याचा प्रयत्न केला होता. १५५ जणांना अटक केल्याच्या बातम्या येत होत्या. ८५ देशांतून आलेल्या ३० ते ४० हजारांहून अधिक दहशतवाद्यांच्या तुलनेत ही संख्या नगण्य होती. एकट्या युरोपातून चार हजारांहून अधिक मुजाहिदीन आले होते. त्यापैकी १७०० हून अधिक फ्रान्सचे नागरिक होते.
भारताचे माजी राजकीय सल्लागार तालमीझ अहमद यांच्या मते, गंगा-जमुनी संस्कृतीचे पाईक असणारे भारतीय मुस्लीम हिंदूंसोबत सौहार्दपूर्ण वातावरणात राहात आले आहेत. त्यामुळे त्यांनी आयसीसची दहशतवादी विचारसरणी पूर्णपणे नाकारली. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीचे माजी सहाय्यक सचिव डेव्हिड हेमन यांच्या मते, भारतीय मुस्लिम हे देशाच्या बहुसांस्कृतिक ओळखीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ते दहशतवादाला कायम नाकारत आले आहेत.
सुफी परंपरा
इस्लामची अध्यात्मिक परंपरा म्हणजे सुफी परंपरा. या परंपरेनेच बहुतांश भारतीय मुस्लिम संस्कृतीला घडवले आहे. भारतीय संस्कृतीत त्यांचे मोठे योगदान आहे. देशातील भक्ती चळवळीसह सुफी विचारांनी ५०० वर्षांहून अधिक कालावधीत संमिश्र संस्कृतीला जन्म दिला. त्यामुळेच सलाफी-वहाबी विचारांनी प्रेरित असणाऱ्या अल कायदा आणि आयसीस यांसारख्या संघटना भारतात आपले जाळे तयार करण्यात सपशेल अपयशी ठरल्या.
भारतीय मुस्लिम आपल्या उपजीविकेशी इतके जोडलेले आहेत की ते आपसूकच हिंसक कारवायांपासून दूर राहतात. भारताची पारंपारिक सामाजिक आणि कौटुंबिक मूल्ये यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कुटुंबीयांचा त्यांच्यावर दबाव असतो. त्यामुळे पश्चिम आशियातील देशांतील नागरिकांना तुर्कस्तान, इराक, सीरिया किंवा अफगाणिस्तानात लढण्यासाठी जाणे सोपे असते. भारतीय मुस्लिमांना त्यांची सांस्कृतिक आणि सामाजिक बंधने असे करण्यापासून रोखतात.
भारतीय मुस्लिमांसमोर अनेक संकटे आहेत, असे माध्यमांना वाटते. मात्र मुस्लिमांची वीण इथल्या संस्कृतीशी इतकी घट्ट विणली गेली आहे की ते सगळ्या संकटांचा धैर्याने मुकाबला करण्यात सक्षम आहेत. सोबतच त्यांची राष्ट्रनिष्ठा वादातीत आहे. इथल्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास जपण्यात मीडियाची भूमिका महत्वाची ठरते आणि ती भूमिका सुधारण्याची गरज आहे.
(लेखक दै.हिंदुस्तान चे संपादक होते)
(अनुवाद: पूजा नायक)