- राजीव कुमार सिंग
मध्य प्रदेशातील सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांनी जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. सोमवारी १२ मे ला छपरा येथील नारायणपुर गावातील स्मशानभूमीत त्यांना शासकीय इमामात अंत्यसंकार (दफन) करण्यात आले. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव आणि परिसरातील नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी त्यांच्या पार्थिवावर फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मोहम्मद इम्तियाज हे छपरा जिल्ह्यातील गडखा ब्लॉकमधील नारायणपुर गावचे निवासी होते. १० मे ला जम्मूतील रणबीरसिंगपुरा (आर.एस. पुरा) सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ते शहीद झाले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनुसार, उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांनी अग्रभागी नेतृत्व करताना शौर्याने लढा दिला आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. बीएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांनी बीएसएफच्या सीमा चौकीचे नेतृत्व करताना अत्यंत धैर्याने पुढं येऊन लढा दिला. त्यांच्या या बलिदानाला बीएसएफचा संपूर्ण पारीवार सलाम करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत या दुखाच्या क्षणी खंबीरपणे उभे आहोत.”
रविवारी ११ मे ला जम्मूतील बीएसएफ फ्रंटियर मुख्यालयात पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि वरिष्ठ बीएसएफ अधिकाऱ्यांनी मोहम्मद इम्तियाज यांना श्रद्धांजली वाहिली.
मोहम्मद इम्तियाज यांच्या पश्चात त्यांची पत्नी शहनाज अझीम, दोन मुली बेनझीर खातून आणि फरिदा खातून, तसेच दोन मुलगे इम्रान रझा आणि इमदाद रझा आहेत. इम्तियाज यांच्या बलिदानाची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. या बातमीने गावात आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली होती. यावेळी नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. प्रसंगी लोक कुटुंबाप्रती सहानुभूती आणि या मातीच्या वीरपुत्राप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते.
रविवारी ११ मे ला संध्याकाळी तिरंग्यात गुंडाळलेले इम्तियाज यांचे पार्थिव त्यांच्या गावात अंतिम विधीसाठी पोहोचले. तेव्हा त्यांचा मुलगा इम्रान रझा म्हणाला, “माझ्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले आहे. आम्हाला त्यांचा आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व सैनिकांचा अभिमान आहे. मी त्यांना सलाम करतो. पाकिस्तानला कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे.”
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी काल मंगळवारी इम्तियाज यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबाशी संवाद साधला आणि ५० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. यापैकी २१ लाख रुपये बिहार सरकारच्या निधीतून आणि २९ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिले जाणार आहेत.
इम्तियाज यांच्या कुटुंबाने शहीदाच्या स्मरणार्थ सरकारी सुविधा जसे की आरोग्य केंद्र किंवा रस्त्याला त्यांचे नाव द्यावे, स्मारक उभारावे आणि मोठ्या मुलाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या मागण्या नोंदवून अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या X हँडलवर लिहिले, “छपरा, बिहारचे रहिवासी असलेले बीएसएफ उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज साहेब यांच्या शौर्य आणि बलिदानाला कोटी कोटी सलाम. जम्मूतील सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे शौर्य, धैर्य, बलिदान आणि देशभक्तीला देशवासी नेहमी सलाम करतील.”
मोहम्मद इम्तियाज यांचा भाऊ मोहम्मद मुस्तफा हा सुद्धा भारतीय सैन्य दलात असून सध्या मेघालयात कर्तव्य बजावत आहे. त्यांचा मुलगा मोहम्मद इम्रान रझा पटना येथील पीएमसीएचमध्ये कार्यरत आहे. तर धाकटा मुलगा इमदाद रझा दिल्लीत यूपीएससीची तयारी करत आहे. इमदादने आपल्या शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.