ऑपरेशन सिंदूर: अजित डोवाल यांच्या रणनीतीने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
अजित डोवाल
अजित डोवाल

 

२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. या हल्ल्याने तातडीची आणि ठोस कारवाईची गरज निर्माण केली. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या हद्दीत हल्ले केले. यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. या यशस्वी कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची रणनीती आणि नेतृत्व होते. डोवाल यांनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाला नवे रूप दिले आहे.  

डोवाल यांचा राष्ट्रीय सुरक्षेचा दृष्टिकोन त्यांच्या गुप्तचर क्षेत्रातील अनुभवावर आधारित आहे. पंजाबमधील दहशतवाद, काश्मीरमधील गुप्त कारवाया आणि १९९९ मधील IC-८१४ विमान अपहरणासारख्या संकटांचा सामना त्यांनी केला. त्यांची आक्रमक संरक्षण रणनीती, हल्ल्यापूर्वी कारवाई, ठोस पाऊले आणि अण्वस्त्र पातळीखाली प्रत्युत्तर यावर आधारित आहे. ऑपरेशन सिंदूरच्या नियोजनात ही रणनीती महत्त्वाची ठरली. यामुळे दहशतवादी तळांवर अचूक हल्ले शक्य झाले.  

ऑपरेशन सिंदूरचे यश अपघाती नव्हते. ऑपरेशनपूर्वी सवाई नाला, मुरिदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी तळांचे नकाशे, बांधकाम, भूप्रदेश यांचा सखोल अभ्यास झाला. डोवाल यांच्या मते, अचूक गुप्तचर माहिती ही यशाची गुरुकिल्ली आहे. या तयारीमुळे ऑपरेशन यशस्वी झाले.  

या कारवाईत प्रमुख दहशतवादी ठार झाले. मुरिदके येथील लष्कर-ए-तैबाचा कमांडर मुदस्सिर खादियन खास, बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचा रणनीतिकार हाफिज मुहम्मद जमी आणि अफगाणिस्तानातून शस्त्र तस्करी करणारा खालिद अबू अकाशा यांचा समावेश होता. या मोठ्या दहशतवाद्यांच्या तळांचा नाश करणे म्हणजे डोवाल यांच्या ठोस धोरणाचे फलित आहे. त्यांनी प्रत्यक्ष येणाऱ्या धोक्यांना लक्ष्य केले.  

ऑपरेशन सिंदूरचे यश फक्त लष्करी विजयापुरते मर्यादित नव्हते. याने पाकिस्तानच्या सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संगनमत उघड केले. मुरिदके येथील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित होते. यात लेफ्टनंट जनरल फैय्याज हुसेन शाह, मेजर जनरल राव इम्रान सरताज आणि पंजाबचे पोलीस महानिरीक्षक डॉ. उस्मान अन्वर यांचा समावेश होता. हे डोवाल यांच्या धोरणाशी सुसंगत आहे. ते दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांना राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडतात.  

ऑपरेशननंतरच्या तयारीतही डोवाल यांचे धोरण दिसले. भारतीय सैन्याने रामनगर, नौशेरा आणि मिरान साहिब येथे पाकिस्तानी ड्रोन हल्ले तातडीने हाणून पाडले. ड्रोन आणि पाळत ठेवण्याच्या क्षमतेवर डोवाल यांनी नेहमीच भर दिला. यामुळे भारताच्या सीमासुरक्षेत मोठी वाढ झाली. 

संस्थात्मक पातळीवर डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला बळकट केले. २०१९ मध्ये याला कायदेशीर अधिकार आणि मंत्रिमंडळ दर्जा मिळाला. डोवाल यांनी अनुभवी आणि तरुण व्यावसायिकांना संधी दिली. यात पहिले अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राजिंदर खन्ना आणि उपसल्लागार टीव्ही रविचंद्रन, पवन कपूर यांचा समावेश आहे.  

ऑपरेशन सिंदूरने डोवाल यांचे एकत्रित सुरक्षा धोरण दाखवले. संरक्षण नियोजन समितीच्या नेतृत्वात त्यांनी विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढवला. यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याची भारताची क्षमता बळकट झाली. अजित डोवाल यांच्या रणनीती आणि नियोजनाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. याने भारताची तात्कालिक सुरक्षा मजबूत केली. भविष्यातील धोरणांसाठीही मार्गदर्शन तयार झाले. बदलत्या धोक्यांमध्ये भारत डोवाल यांच्या दूरदृष्टी आणि अचूक रणनीतीमुळे सुरक्षित आहे.  
 
- अरित्र बॅनर्जी 
(लेखक हे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि हवाई दल क्षेत्रातील पत्रकार आहेत.)
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter