पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा देत दहशतवादाविरोधातील भारताची ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, "आम्ही दहशतवादाविरोधात लक्ष्मण रेषा आखली आहे. आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ. ऑपरेशन सिंदूर हे आमच्यासाठी सामान्य बाब आहे. पाकिस्तानात कुठेही दहशतवादी शांततेत राहू शकणार नाहीत, त्यांना घरात घुसून ठेचले जाईल." त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाचे कौतुक केले. आदमपूर (पंजाब) येथील हवाई तळाला भेट देताना पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत माता की जय हा केवळ नारा नाही, तर राष्ट्रासाठी बलिदान देण्याचा संकल्प आहे. पहलगाम हल्ल्यात आमच्या माता-भगिनींचे कुंकू हिरावल्यानंतर आमच्या सैन्याने दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांचा नायनाट केला. पळपुट्या पाकिस्तानने लपून-छपून घुसखोरी केली, पण त्यांना ‘हिंद’च्या लष्कराचे सामर्थ्य विसरले. आमच्या हवाई दलाने दहशतवाद्यांचे सुमारे नऊ तळ उद्ध्वस्त केले आणि 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना इशारा आहे, आगळीक केली तर परिणाम भोगावे लागतील."
"ऑपरेशन सिंदूर हे आमच्यासाठी न्यू नॉर्मल आहे. भारताची दहशतवादाविरोधातील लक्ष्मण रेषा स्पष्ट आहे. यापुढे कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही," असे मोदींनी ठणकावले. त्यांनी पुढे सांगितले, "हवाई दलाच्या पराक्रमाचे पडसाद जगभर उमटले आहेत. या मोहिमेदरम्यान भारतीय नागरिक खंबीरपणे सैनिकांसोबत उभे राहिले. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात जवानांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता आहे. ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या नीती, नियत आणि निर्णायक क्षमतेचा त्रिवेणी संगम आहे."
पंतप्रधानांनी भारतीय हवाई दलाच्या शस्त्रसामग्री आणि ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञानाचेही तोंडभरून कौतुक केले. "महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याला लागू असणाऱ्या काव्यपंक्ती ‘कौशल दिखलाया चालों में, उड गया भयानक भालों में, निर्भीक गया वह ढालों में, सरपट दौडा करवालों में आजच्या अत्याधुनिक भारतीय शस्त्रांना आणि हवाई दलाच्या सामर्थ्याला चपखल बसतात," असे त्यांनी सांगितले. ड्रोन तंत्रज्ञान आणि डेटा-आधारित युद्धसज्जतेचा उल्लेख करत त्यांनी हवाई दलाच्या आधुनिकतेची प्रशंसा केली.
मोदींनी पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करताना म्हटले, "पाकिस्तानच्या विनवणीनंतरच आमचे जवान थांबले, अन्यथा त्यांचा आणखी विध्वंस झाला असता. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान जखमी झाला आहे. त्यांनी पुन्हा हल्ला केल्यास सडेतोड प्रत्युत्तर मिळेल." त्यांनी पाकिस्तानच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना हवाई दलाने निष्प्रभ केल्याचेही नमूद केले. "पाकिस्तानला आता समजले असेल की, भारताच्या लष्कराशी पंगा घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे," असे ते म्हणाले.