भारताने फेटाळला डोनाल्ड ट्रम्प यांचा 'हा' दावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

व्यापार रोखण्याच्या धमकीमुळेच भारत पाकिस्तानचा संघर्ष थांबला हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान अमेरिकेशी झालेली चर्चा केवळ लष्करी मुद्द्यांवर होती. त्यात व्यापाराचा कोणताही विषय नव्हता, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, जम्मू-काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे भारताचे धोरण कायम असून पाकव्याप्त काश्‍मीर परत मिळविण्याची भूमिकाही कायम असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या संरक्षण दलांनी आणि परराष्ट्र मंत्रालयाने सातत्याने पत्रकार परिषदा घेत देशाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्याच मालिकेत आजच्या पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेला दावा खोडून काढला. दोन्ही देशांना व्यापारबंदीचा इशारा दिल्यानेच शस्त्रसंधी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, ‘७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून १० मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्याची सहमती होईपर्यंत भारत आणि अमेरिका दरम्यान केवळ लष्करी परिस्थितीबाबत चर्चा झाली. या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नाही,’ असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तसेच, काश्मीर प्रकरणी मध्यस्थीचा ट्रम्प यांचा प्रस्तावही भारताने उडवून लावला. 

जम्मू-काश्मीर संदर्भात बोलताना जयस्वाल म्हणाले,‘‘जम्मू-काश्मीरशी संबंधित कोणतेही मुद्दे भारत व पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय स्वरूपातच सोडवले जावेत, ही भारताची दीर्घकालीन भूमिका आहे. या घोषित धोरणात कोणताही बदल झालेला नाही. यातील पाकिस्तानने बेकायदा पद्धतीने बळकावलेला भारतीय भूभाग (पाकव्याप्त काश्मीर) परत मिळवणे ही एकमेव बाब अपूर्ण राहिलेली बाब आहे.’’ तसेच, दहशतवादाची पाठराखण करणे पाकिस्तान कायमस्वरूपी थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणीवाटप करार भारत स्थगित ठेवेल, असेही जयस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितले.

धमकी सहन करणार नाही
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षातून आण्विक युद्धाची शक्यताही वर्तविली होती. हा मुद्दाही जयस्वाल यांनी खोडून काढला. "भारताची लष्करी कारवाई ही पूर्णतः पारंपरिक पातळीवर होती. पाकिस्तानची नॅशनल कमांड ऑथॉरिटी १० मे रोजी बैठक घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र या बातम्यांचे खंडन पाकिस्ताननेच केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अणुयुद्धाच्या कोणत्याही शक्यतेला नकार दिला," असे जयस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले. अण्वस्त्रांच्या धमकीला भारत बळी पडणार नाही आणि सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाच्या नावाखाली ते सहनही केले जाणार नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे, असे जयस्वाल यांनी बजावले.