अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील रमजानचा अनोखा अनुभव

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 24 d ago
अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील इफ्तार
अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील इफ्तार

 

कॉलेजचे दिवस अविस्मरणीय असतात. महाविद्यालयीन आयुष्यात आलेले अनुभव पुढे कायमस्वरूपी लक्षात राहतात. अशाच अनुभवापैकी एक अनुभव म्हणजे अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील रमजान पाळणे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे एक विद्यापीठ आहे. अनेक चांगल्या कारणांनी हे विद्यापीठ प्रसिद्ध आहे.  विशेषत: तेथील गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम, ते शिकण्याचे पर्याय, शिक्षण आणि सर्वात महत्वाच म्हणजे देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांत याची गणना होते.  यासोबतच विद्यापीठाची विशिष्ट प्रकारची  ‘तेहजीब’ या विद्यापीठाला स्वतंत्र ओळख तयार करते. 

येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच धार्मिक श्रद्धा आणि अध्यात्म यांमध्ये समतोल साधण्याची संधी मिळते.  वर्षातून एकदा साजरा होणाऱ्या रमजानमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आत्मशुद्धीकडे लक्ष देता येते. समवयस्क मित्र आणि बाकी वसतिगृहातील मुले यांच्यामुळे विद्यापीठातील रमजान एक संस्मरणीय अनुभव बनतो. सकाळी गजर काम करो वा ना करो तुमचे सोबती तुम्हाला झोपेतून हमखास जागे करणार.

पहाटे 03:45 वाजता वसतीगृहाजवळील लोक दरवाजा ठोठावून सेहरीसाठी (सूर्योदयापूर्वीचे पहिले जेवण) उठवतात. त्यावेळी प्रत्येक मजल्यावर दुध गरम करण्यासाठी दोन हीटर ठेवलेले असत. नशीब चांगल असलं की दुधाचे पाकीट मिळते आणि ते गरम करायला हिटर देखील खाली असतात.

एवढे करूनही तुम्हाला उशीर झालाच तर एका ओळीत उभे राहावे लागते. त्यातही हिटर च्या शोधात या रांगेतून त्या रांगेत धावपळ करावी लागते. एवढे करूनही  एक अंडे, एक केळी, तीन ब्रेड स्लाइस, आणि दीड कप दुधात समाधान मानावे लागते. रोज काय तेचते या तक्ररारीत हे दिवस कधी निघून  जातात कळतही नाही.

 
काही वेळेस फजरच्या प्रार्थनेनंतर मित्रांसोबत फिरायला जातो, तर काही वेळा लगेच झोपून, सकाळी ८ पर्यंत या कॉलेजच्या वेळेपर्यंत थोडी झोप घ्यायची हा क्रम. त्यानंतर उन्हाचा दाह कमी होऊन वातावरण निवळेपर्यंत वर्गात लेक्चर करणे  किंवा ग्रंथालयात वाचत बसणे,असे  काहीतरी करत बसायचे. अगदीच कधी वातावरणात गारवा जाणवत असेल तर मग बाहेर बसून ईदचे नियोजन करणे. एवढ्या एका महिन्याच्या उपवासानंतर ईदला मेजवानीचा बेत काय ठेवायचा? कोणते कपडे खरेदी करायचे? किंवा आणखी काय खरेदी करायचे यांवर चर्चा सत्र चालते.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील रमजान साजरा करणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अमीर निशान मार्केटमध्ये जाण्याचे नियोजन करणे. अमीर निशान मार्केट हे नेहमी गजबजलेले असते. विविध प्रकारच्या सुगंधांनी दरवळणाऱ्या या बाजारात आम्ही  खिशाचा अंदाज घेऊन फळांची खरेदी करून ६.३० च्या आत परत येतो.

यावेळी हॉस्टेलच्या मेसमध्ये इफ्तारसाठी एक रांग लागते. हातात प्लेट् घेऊन एका रांगेत उभे राहायचे. मग सीताफळ, चिप्स, छोले, खजूर आणि बटाट्याच्या चिवडा असे अनेक पदार्थ ताटात पडतात . त्यात भर पडते  ती वसतिगृहात राहणाऱ्या लोकांनी बनवलेल्या पदार्थांची.

 
तसेच इफ्तारी आणि प्रार्थनेसाठी मित्रांना बोलावले जाते. मग विविध महाविद्यालयीन विभाग तसेच वसतिगृह प्राधिकरणांद्वारे इफ्तार पार्ट्या आयोजित केल्या जातात. यामुळेच एकजुटीची भावना निर्माण होते. नानाविध प्रकारांनी खाद्यपदार्थांनी ताट सजवले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या शरबतांनी ग्लास भरलेले असतात. उपवास सोडण्यासाठी सर्वजण एकत्र जमतात. लांब कपड्यावर आपापले ताट ठेऊन उपवास सोडतात. 

रमजानचा पवित्र महिना मुस्लिमांच्या पवित्र ग्रंथाच्या, म्हणजेच कुराणच्या प्रकटीकरणाची सुरुवात आहे. त्यामुळे  या शुभ महिन्यात शक्य तितके वाचण्याचा आणि ईश्वरासोबताचे नाते दृढ व्हावे  यासाठी चांगली कृत्ये करण्याचा उपदेश दिला जातो. 

जगभरातील मुस्लिम संपूर्ण रमजान महिन्यात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात. याचा उद्देश केवळ अन्न आणि द्रवपदार्थ प्राशन न करणे एवढाच नाही तर एखाद्याचे शरीर आणि आत्मा हेही अयोग्य कृती करण्यापासून दूर राहावे आणि त्यातून शरीर आणि मनाची शुद्धी व्हावी, हा आहे.

वर्षातील हा काळ स्वतःला कमी भाग्यवान समजणाऱ्या लोकांची मदत करून, स्वतः कडे असणाऱ्या गोष्टींसाठी  कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो.  सर्वजण आपल्याला ऐपतीप्रमाणे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र या महिन्यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांना येणारे अनुभव त्यांच्यासाठी आयुष्यभराचा ठेवाच असतो.  
 
(अनुवाद: पूजा नायक)
 
- सादिया कादिर 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter