दिल्लीच्या जामा मस्जिदीत हजारो रोजेदारांच्या उपस्थितीत पार पडला सौदी अरेबियाचा शाही इफ्तार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
दिल्लीच्या जामा मस्जिदीत हजारो रोजेदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शाही इफ्तारमधील क्षण
दिल्लीच्या जामा मस्जिदीत हजारो रोजेदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शाही इफ्तारमधील क्षण

 

सौदी अरेबियाने आपल्या आंतरराष्ट्रीय रमझान उपक्रमाचा भाग म्हणून ऐतिहासिक जामा मस्जिदीत १,५०० हून अधिक रोजेदारांसाठी भव्य सामूहिक इफ्तारचे आयोजन केले होते. दोन पवित्र मशिदींच्या संरक्षकांच्या (कस्टोडियन ऑफ द टू होली मॉस्क) इफ्तार कार्यक्रमांतर्गत, भारतातील सौदी दूतावासाच्या माध्यमातून इस्लामिक व्यवहार, दावाह आणि मार्गदर्शन मंत्रालयाने हा सोहळा आयोजित केला होता.

सूर्यास्तापूर्वी मस्जिदीच्या अंगणात रोजेदारांच्या रांगा लागल्या होत्या. तिथे मगरिबच्या नमाजपूर्वी जेवणाचे वाटप करण्यात आले. उपवास करणाऱ्या व्यक्तींना आधार देणे आणि रमझानच्या पवित्र महिन्याचे वैशिष्ट्य असलेली एकता आणि सौहार्दाची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या मेळाव्याला मस्जिदीचे इमाम आणि प्रवचनकार अहमद अल-बुखारी यांच्यासह अनेक इस्लामिक विद्वान आणि समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
अनेक उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून जगभरातील इस्लाम आणि मुस्लिम समाजाची सेवा करण्याच्या सौदी सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. असे मानवतावादी कार्यक्रम इस्लामिक आणि धर्मादाय कार्यांना पाठबळ देण्यासाठी किंगडमची भूमिका अधोरेखित करतात, तसेच लोकांमधील एकता आणि सहकार्य अधिक मजबूत करतात, असे त्यांनी नमूद केले. 

मुघल सम्राट शाहजहान यांनी १६५६ मध्ये बांधलेली जामा मशीद ही आजही भारतातील सर्वात मोठी आणि प्रमुख मस्जिदींपैकी एक आहे. विशेषतः रमझानमध्ये इथे दररोज हजारो भाविक येतात. सौदी अरेबिया दरवर्षी अनेक देशांमध्ये मुस्लिम समुदायांना पाठिंबा देण्यासाठी आणि या पवित्र महिन्यात परस्पर संबंध दृढ करण्यासाठी अशाच प्रकारचे इफ्तार कार्यक्रम आयोजित करते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter