भारताच्या सांस्कृतिक वैभवात अमुल्य भर टाकणारे १० दिग्गज मुस्लीम साहित्यिक-कलावंत

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 d ago
स्वतंत्र भारतात अमुल्य सांस्कृतिक योगदान देणारे १० दिग्गज मुस्लीम साहित्यिक आणि कलावंत
स्वतंत्र भारतात अमुल्य सांस्कृतिक योगदान देणारे १० दिग्गज मुस्लीम साहित्यिक आणि कलावंत

 

गौस सिद्दीकी, नवी दिल्ली

स्वतंत्र भारतात साहित्य आणि कला क्षेत्रात मुस्लिमांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापैकी अनेक जणांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली, तर काहींनी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली. 

विविध भाषांमधील साहित्यात मुस्लिमांचे योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे आहे, त्याचबरोबर संगीत, चित्रकला आणि ललित कलांच्या इतर प्रकारांमध्येही मुस्लिम कलाकारांच्या योगदानाने जागतिक स्तरावर ओळख आणि प्रशंसा मिळवली आहे. 

खाली आम्ही अशा केवळ दहा साहित्यकार आणि कलावंतांची थोडक्यात ओळख करून देत आहोत, ज्यांना आपापल्या क्षेत्रात मोठे स्थान प्राप्त आहे आणि ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.

१. उस्ताद बिस्मिल्ला खान

उस्ताद बिस्मिल्ला खान यांना सनईचे बादशाह म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी सनईला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांचे व्यक्तिमत्व संगीत, आध्यात्मिकता आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ होते. त्यांचा जन्म बिहारमध्ये झाला, पण त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ बनारस (वाराणसी) येथे गेला. 

उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईला केवळ एक पारंपरिक वाद्य म्हणून नव्हे, तर एक अभिजात वाद्य म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांनी जगभरात आपल्या कलेचे प्रदर्शन केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याच्या मुहूर्तावर आपल्या सनईच्या सुरांनी राष्ट्राला संबोधित करणारे ते पहिले व्यक्ती होते. 

त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री (१९६१), पद्मभूषण (१९६८), पद्मविभूषण (१९८०) आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' (२००१) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

२. कुर्रतुलऐन हैदर
कुर्रतुलऐन हैदर या उर्दू साहित्यातील एक श्रेष्ठ कथाकार, कादंबरीकार आणि निबंधकार होत्या. त्यांना उर्दू कथाविश्वात क्रांती घडवणाऱ्या लेखिका म्हणून ओळखले जाते. त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी 'आग का दरिया' (१९५९) ही उर्दू साहित्यात मैलाचा दगड मानली जाते. 

त्यांच्या पुस्तकांमध्ये 'सफिना-ए-गम-ए-दिल', 'आखिर-ए-शब के हमसफर', 'चांदनी बेगम' आणि 'कार-ए-जहां दराज है' यांचा समावेश आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री (१९८४) आणि मरणोत्तर पद्मभूषण (२००५) यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

३. मौलाना अबुल कलाम आझाद
भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे एक उच्च दर्जाचे गद्य लेखक होते. त्यांच्या लेखनात ज्ञान, ओघवती भाषा आणि प्रभावी मांडणीचे असे वैशिष्ट्य दिसून येते, जे उर्दू साहित्यात क्वचितच पाहायला मिळते. 

मौलाना अरबी आणि फारसी शब्द व रचनांचा कुशलतेने वापर करत, ज्यामुळे त्यांच्या लेखनाला एक उच्च साहित्यिक दर्जा प्राप्त झाला. त्यांच्या गद्य रचनांमध्ये 'अल-हिलाल' आणि 'अल-बलाघ' सारख्या क्रांतिकारी वृत्तपत्रांचे अग्रलेख, 'तजकिरा' आणि विशेषतः 'गुबार-ए-खातिर' यांचा समावेश आहे. सोबतच त्यांचे कुरआन भाष्यही जागतिक दर्जाचे मानले जाते. 

मौलाना यांना त्यांच्या राजकीय, साहित्यिक आणि पत्रकारितेतील योगदानाच्या सन्मानार्थ 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

४. अली सरदार जाफरी
अली सरदार जाफरी हे उर्दू साहित्यातील एक प्रख्यात प्रगतिशील कवी, समीक्षक, लेखक आणि विचारवंत होते. त्यांच्या कवितेत क्रांती, शांतता, बंधुभाव आणि सामाजिक न्यायाचा आवाज ऐकू येतो. त्यांच्या प्रसिद्ध रचनांमध्ये 'नयी दुनिया को सलाम', 'परजा का गीत', 'मेरे ख्वाब मेरी ताबीर' आणि 'अमन का सितारा' यांचा समावेश आहे. 

जाफरी यांनी गद्य लेखनही केले आणि चित्रपट, टीव्ही व रंगभूमीसाठी संवादही लिहिले. त्यांना पद्मश्री (१९६७) आणि ज्ञानपीठ पुरस्कार (१९९७) यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

५. रहमान राही
रहमान राही हे काश्मिरी भाषा आणि साहित्याचे प्रसिद्ध कवी, गद्य लेखक आणि विचारवंत होते. त्यांनी काश्मिरी भाषेला साहित्यिक उंचीवर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची गणना आधुनिक काश्मिरी कवितेच्या संस्थापकांमध्ये होते. त्यांच्या कवितेत तसव्वूफ म्हणजे सुफिजम, समकालीन जाणीव, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-राजकीय समस्यांचे प्रतिबिंब दिसते. 

रहमान राही यांच्या प्रसिद्ध रचनांमध्ये 'नवरोज-ए-सहरा', 'सियाह रूद जरीन मंज' आणि 'कस व नाख' यांचा समावेश आहे. रहमान राही यांना साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री आणि २००७मध्ये काश्मिरी भाषेसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कवी होण्याचा मान मिळाला.

६. एम. एफ. हुसेन
एम. एफ. हुसेन यांचे पूर्ण नाव मकबूल फिदा हुसेन होते. हुसेन विसाव्या शतकातील महान भारतीय चित्रकार आणि कलाकार होते. त्यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचे संस्थापक मानले जाते. त्यांच्या कलाकृतींमध्ये रामायण, महाभारत, गांधी, मातृत्वाची भावना, स्त्री आणि घोडा यांसारख्या पारंपरिक भारतीय विषयांना आधुनिक शैलीत सादर केले गेले आहे. 

हुसेन यांच्या प्रसिद्ध कलाकृतींमध्ये 'मदर इंडिया', 'थ्रू द आय ऑफ अ हॉर्स', 'माँ सिरीज' यांचा समावेश आहे. त्यांना पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (१९७३) आणि पद्मविभूषण (१९९१) यांसारख्या उच्च पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.

७. उस्ताद झाकिर हुसेन
उस्ताद झाकिर हुसेन यांना उपखंडातील महान तबलावादक, संगीताचे जादूगार आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक दूत मानले जाते. त्यांच्या तबलावादनात वेग, संतुलन, कोमलता आणि जटिलतेचा असा मिलाफ आढळतो. या वैशिष्ट्यांनी त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवले. 

हुसेन यांनी जगभरातील शास्त्रीय, सुफी, जॅझ आणि पाश्चात्य संगीत कलाकारांसोबत काम केले आहे. उस्ताद यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये पद्मश्री (१९८८), पद्मभूषण (२००२), ग्रॅमी पुरस्कार (अनेक वेळा) आणि संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२०२३) यांचा समावेश आहे.

८. तय्यब मेहता
तय्यब मेहता हे भारतातील एक प्रसिद्ध आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आधुनिक चित्रकार होते, ज्यांनी देशी चित्रकलेला एक नवीन दिशा दिली. तय्यब मेहता यांची गणना त्या चित्रकारांमध्ये होते ज्यांनी पारंपरिक आणि आधुनिक कलेला एकत्र करून एक अद्वितीय शैली निर्माण केली. 

तय्यब मेहता यांच्या चित्रांमध्ये विरोधाभास, दुःख आणि मानवी संघर्ष यांसारख्या विषयांना सुंदरपणे मांडले गेले आहे. त्यांच्या प्रसिद्ध कलाकृतींमध्ये महाभारतातील पात्रे, देवी-देवता, तुटलेली मानवी शरीरे आणि दुहेरी आकृत्या यांचा समावेश आहे. तय्यब मेहता यांना त्यांच्या कलेच्या सन्मानार्थ पद्मभूषण आणि कालिदास सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

९. उस्ताद बडे गुलाम अली खान
उस्ताद बडे गुलाम अली खान यांची गणना उपखंडातील सर्वश्रेष्ठ शास्त्रीय गायकांमध्ये केली जाते. ते पतियाळा घराण्याशी संबंधित होते, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीतात एक अद्वितीय शैली सादर केली. त्यांनी ख्याल, ठुमरी आणि दादरा अशा प्रकारे गायले की ऐकणारे मंत्रमुग्ध होत. त्यांच्या आवाजात गोडवा, खोली आणि आध्यात्मिकतेचा मिलाफ होता. 

बडे गुलाम अली यांची गायनशैली आकर्षक ताना, कोमल सूर आणि सुंदर सादरीकरणाने परिपूर्ण होती. ते आपल्या काळातील संगीत मैफिलींचे बादशाह म्हणून ओळखले जात. भारत सरकारने त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण यांसारख्या उच्च पुरस्काराने सन्मानित केले.

१०. बेगम अख्तर
बेगम अख्तर, ज्यांना जग 'गझल सम्राज्ञी' (मलिका-ए-गझल) या नावाने ओळखते, त्यांची गणना उपखंडातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिकांमध्ये होते. बेगम अख्तर यांनी गझल, ठुमरी आणि दादरा यांना तो दर्जा दिला, ज्यामुळे या गायन प्रकारांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. त्यांच्या आवाजात दुःख, साधेपणा आणि खोलीचा असा मिलाफ होता, जो थेट हृदयाला भिडत असे. 

अख्तरी बाईंनी उर्दू शायरीला आपल्या सुरांनी असे सजवले की गझल एक खास भावना बनली. बेगम अख्तर यांना त्यांच्या कलात्मक योगदानाच्या सन्मानार्थ पद्मश्री, पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.