नवी दिल्ली
इराणमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आणि अमेरिकेसोबत वाढलेला तणाव यामुळे इराणने आपली हवाई हद्द (Airspace) बंद केली आहे. याचा थेट परिणाम भारतीय विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर झाला असून एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट यांसारख्या कंपन्यांनी गुरुवारी (१५ जानेवारी २०२६) प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमाने आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून, यामुळे प्रवासाचा वेळ वाढून विमानांना विलंब होत आहे.
इराणमध्ये वाढलेली महागाई आणि आर्थिक संकटामुळे व्यापारी व नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे २,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या परिस्थितीमुळे इराणने सुरक्षेच्या कारणास्तव आपले आकाश नागरी विमानांसाठी बंद केले आहे. एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी मार्ग बदलणे शक्य नाही, अशी काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विशेषतः अमेरिका आणि युरोपला जाणाऱ्या विमानांना याचा मोठा फटका बसला असून, पाकिस्तानची हवाई हद्द आधीच बंद असल्याने भारतीय विमानांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना उड्डाणांची स्थिती तपासूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. इराणच्या हवाई हद्दीतून विमाने नेणे आता धोकादायक बनले असल्याने अनेक कंपन्यांनी इराक किंवा इतर लांबच्या मार्गाचा अवलंब केला आहे. मात्र, यामुळे लांब पल्ल्याच्या विमानांना इंधन पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
या गंभीर परिस्थितीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी रात्री इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यामध्ये इराणमधील अस्थिरता आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर चर्चा करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना तूर्तास इराणचा प्रवास टाळण्याचा 'सक्त सल्ला' दिला आहे.
तेहरानमधील भारतीय दूतावासानेही एक पाऊल पुढे टाकत इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या लोकांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही मार्गाने (विमान किंवा इतर वाहतूक) तात्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनी दूतावासाच्या हेल्पलाईनवर नोंदणी करावी, असेही सांगण्यात आले आहे.