नवी दिल्ली
मध्य-पूर्व आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. इराण आणि आसपासच्या प्रदेशातील हवाई हद्दीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आज, रविवारी ४४४ आंतरराष्ट्रीय विमाने रद्द होण्याची शक्यता आहे. यापूर्वी शनिवारीदेखील ४१० विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
विमान वाहतूक संचालनालयाचे अधिकारी (DGCA) सध्या सर्व विमान कंपन्यांच्या सतत संपर्कात आहेत. प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याने, सुरक्षेच्या सर्व कडक मानकांचे आणि नियमांचे पालन करण्याचे आदेश सर्व कंपन्यांना देण्यात आले आहेत. प्रमुख विमानतळांवर आता विशेष सतर्कता बाळगली जात असून विमानांचे मार्ग बदलणे किंवा उड्डाणे रद्द करणे यांसारख्या बदलांची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विमानतळावर मोठी गर्दी होऊन प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, म्हणून मंत्रालयाने एक महत्त्वाची विनंती केली आहे. प्रवाशांनी घरून निघण्यापूर्वी आपल्या विमानाचे नेमके स्टेटस तपासावे आणि संबंधित एअरलाईन्सशी संपर्क साधावा. मुंबई, दिल्ली यांसारख्या महत्त्वाच्या विमानतळांवर प्रवाशांच्या मदतीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विमानतळावरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि प्रवाशांना विनासायास माहिती मिळवून देणे हे काम सध्या प्राधान्याने केले जात आहे.
विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी 'एअरसेवा' प्लॅटफॉर्म पूर्णपणे सक्रिय करण्यात आला आहे. शनिवारी या प्लॅटफॉर्मवर २१६ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या, त्यापैकी १०५ तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले आहे. सर्व संबंधित यंत्रणा प्रवाशांना शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपापसात समन्वय ठेवून काम करत आहेत.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढल्याने मध्य-पूर्वेतील अनेक देशांनी आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केली आहे. यामुळे जगभरातील विमान वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे. भारतासह जगभरातील अनेक विमान कंपन्यांना इंधनाचा अधिक वापर करून लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र तोपर्यंत प्रवाशांनी सतर्क राहून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.