परवाझ: राष्ट्रउभारणीत योगदान देणाऱ्या भारतीय मुस्लिम महिलांना मानवंदना

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 10 h ago
'Parwaaz': A salute to the contribution of Indian Muslim women in nation-building
'Parwaaz': A salute to the contribution of Indian Muslim women in nation-building

 

आतिर खान

राष्ट्रउभारणीत भारतीय मुस्लिम महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हा आपल्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष झाले आहे.

देशाच्या प्रगती आणि विकासात त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. भारताच्या वैविध्यपूर्ण सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत त्या सतत मोलाची भर घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कामाचा सन्मान व्हायलाच हवा.

इतर सर्व समाजातील महिलांप्रमाणेच मुस्लिम महिलांच्या यशाचीही पुरेशी दखल घेतली गेली नाही. त्यांच्या कर्तृत्वाला हवा तसा न्याय मिळाला नाही.

इस्लामच्या मूळ शिकवणुकीत महिलांना अनेक महत्त्वाचे अधिकार दिले आहेत. राजकारण, व्यापार आणि वारसाहक्क या सर्वच ठिकाणी त्यांना समान अधिकार मिळाला आहे.

सक्षमीकरणाच्या या तत्त्वांमधून प्रगतीचा एक भक्कम पाया रचला गेला. तरीही खुद्द समाजातीलच काही चुकीच्या प्राधान्यक्रमांमुळे मुस्लिम महिलांच्या खऱ्या क्षमतेला अनेकदा दाबून टाकले गेले.

भारत हा समान संधींचा देश आहे. या देशाने मुस्लिम महिलांना विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करण्याची मोठी संधी दिली आहे. बेगम हजरत महल आणि बी अम्मा यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने सहभाग घेतला. या क्रांतिकारी नेत्यांनी शौर्य आणि संघर्षाचा एक मोठा वारसा मागे ठेवला आहे.

या पहिल्या फळीतील महिलांनी पुढच्या पिढीसाठी एक भक्कम मार्ग तयार केला. त्यानंतर अनेक कर्तृत्ववान मुस्लिम महिला पुढे आल्या. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे.

हैदराबादच्या पहिल्या महिला न्यूरोसर्जन डॉ. मरियम अफीफा अन्सारी यांचेही नाव अत्यंत आदराने घेतले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिम महिलांचे हे योगदान अत्यंत लक्षणीय आणि दूरगामी परिणाम करणारे आहे.

आसामच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या सैयदा अन्वरा तैमूर या राजकीय नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहेत. दुसरीकडे कुर्रतुलैन हैदर, मधुबाला आणि बेगम अख्तर यांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांकडून अनेक पिढ्यांना आजही प्रेरणा मिळत आहे.

आजही भारतीय मुस्लिम महिला जुन्या मर्यादा ओलांडून यशाची नवी व्याख्या तयार करत आहेत. राजकारणापासून ते उद्योग, क्रीडा, शिक्षण आणि कला अशा सर्वच क्षेत्रांत त्या चमकदार कामगिरी करत आहेत.

त्यांचा चिवटपणा, प्रबळ इच्छाशक्ती आणि उत्तुंग यशाच्या कथा सर्वांनाच ऊर्जा देतात. या कथा केवळ महिलांनाच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला मोठी प्रेरणा देतात.

'आवाज द व्हॉईस'ने यापूर्वी 'चेंजमेकर्स' ही मालिका सुरू केली होती. समाजासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या कामावर आम्ही यात प्रकाश टाकला होता. या मालिकेला वाचकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याबद्दल आम्ही सर्व वाचकांचे अत्यंत आभारी आहोत.

या कथा वाचून आम्हाला अनेक ईमेल आणि फोन आले. यावरून अशा यशोगाथा जगासमोर आणणे किती गरजेचे आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

सर्वसमावेशक पत्रकारितेचा आमचा वसा आम्ही असाच पुढे चालवत आहोत. याच वचनबद्धतेचा एक भाग म्हणून आम्ही 'परवाझ' ही एक नवी विशेष मालिका सुरू करत आहोत. याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.

 

या मालिकेतून विविध क्षेत्रांतील आजच्या भारतीय मुस्लिम महिलांच्या उल्लेखनीय यशावर प्रकाश टाकला जाईल. हा उपक्रम म्हणजे त्यांच्या कठोर परिश्रमाला आणि अफाट कर्तृत्वाला दिलेली एक खरी मानवंदना असेल. यातून अनेकांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

'परवाझ' मालिकेचा आजपासून शुभारंभ होत आहे. राजकारणातील मुस्लिम महिलांवर आधारित या पहिल्या विशेष लेखाने या मालिकेची सुरुवात होत आहे. यापुढील भागांमध्ये इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केले जाईल.

आम्ही आमच्या वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की पाठवण्याचे आवाहन करतो. तुम्ही आम्हाला [email protected] या ईमेलवर लिहून कळवू शकता.

(लेखक ‘आवाज द व्हॉइस’चे मुख्य संपादक आहेत.)



Also Likes