डॉ. फरीदा रहमतुल्ला
माझे जन्मस्थान माझ्यासाठी स्वर्ग आहे... या ओळी आहेत डॉ. फरीदा रहमतुल्ला यांच्या. कॉफी, मिरी आणि हिरव्यागार डोंगररांगांनी नटलेल्या कर्नाटकच्या चिकमगाळूर जिल्ह्यातील गुल्लनपेटमध्ये त्यांचे बालपण समृद्ध झाले. या मातीनेच त्यांना प्रतिष्ठा आणि आपलेपणाची पहिली ओळख करून दिली. त्याकाळी मुलींवर प्रेम केले जाई, त्यांची काळजी घेतली जाई, मात्र एका विशिष्ट वयानंतर त्यांच्या शिक्षणाला ब्रेक लावला जाई. शिक्षणावरील या बंधनामुळे डॉ. फरीदा यांच्या मनात प्रश्नांचे पहिले बी रोवले.
लग्नानंतर त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले आणि त्या चिकमगाळूरच्या शांत वातावरणातून बेंगळुरूच्या गजबजलेल्या शहरात आल्या. शहरात त्यांना स्वातंत्र्यासोबतच भीषण विषमतेचे दर्शन घडले. गरिबी रेषेखालील अनेक मुस्लिम कुटुंबांची स्थिती हृदयद्रावक होती. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, मुले सायकल दुरुस्तीच्या दुकानात राबत होती, स्त्रिया अंधाऱ्या खोल्यांमध्ये अगरबत्ती वळत होत्या, तर पुरुष बेरोजगारी किंवा व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकले होते. "त्याच दिवशी मी या परिस्थितीत बदल घडवण्याचा निर्धार केला," त्या आठवतात. हा केवळ संताप नव्हता, तर सहानुभूती आणि जबाबदारीतून घेतलेला तो एक ठोस निर्णय होता.

डॉ. फरीदा यांनी शिक्षणालाच परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले. योग्य मार्गदर्शन आणि मूल्यांनुसार मुलाचे शिक्षण झाले तर बदल आपोआप घडतो, अशी त्यांची ठाम धारणा आहे. त्यांच्या मते, मानवतेची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. बेंगळुरूमध्ये आल्यावर त्यांनी आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. एनएमकेआरव्ही महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, बेंगळुरू विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि धारवाड विद्यापीठातून उर्दू विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. साहित्याने त्यांना अभिव्यक्त होण्याची ताकद दिली. त्यांनी दोन कादंबऱ्या आणि तीन कथासंग्रह लिहिले. 'झरीन शुवायेन' या उर्दू मासिकाच्या माध्यमातून त्यांनी ३० वर्षे वाचकांसाठी एक वैचारिक व्यासपीठ चालवले.
त्यांच्या कल्पनेतील शिक्षणाला 'होली मदर्स इंग्लिश स्कूल'च्या रूपाने मूर्त स्वरूप मिळाले. या शाळेत जवळपास ४० टक्के मुलांना मोफत शिक्षण दिले जाते आणि सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांचे तिथे स्वागत होते. पुढे त्यांनी अवलाहल्ली झोपडपट्टी परिसरात दुसरी शाळा सुरू करून गरजू मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. कोव्हिड महामारीच्या काळात जेव्हा झोपडपट्टीतील मुलांचे ऑनलाइन शिक्षणाअभावी नुकसान होत होते, तेव्हा त्यांनी आपले प्रयत्न अधिक तीव्र केले. जेपी नगर येथे गेल्या ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या शाळेतून अनेक शाळाबाह्य मुलांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. आज ही मुले समाजात सन्मानाने जगत आहेत.
केवळ शाळाच नव्हे, तर 'अल हुदा वुमेन्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन'च्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि कुटुंबांच्या सामाजिक-वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याचे काम केले. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी त्यांनी मातांचे केलेले समुपदेशन पिढ्या वाचवणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत २००८ मध्ये त्यांना साहित्यासाठी 'कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. युनिसेफच्या त्या आठ वर्षे सदस्या होत्या. कर्नाटक सरकारने त्यांची 'कर्नाटक हज समिती'च्या सदस्यपदी नियुक्ती केली होती. २०१९ मध्ये सेंट मदर तेरेसा विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली, तर कुवेम्पू विद्यापीठात त्यांच्या कार्यावर एम.फिल. स्तरावरील संशोधन झाले आहे.
शंभरहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित होऊनही डॉ. फरीदा आजही जमिनीवर आहेत. "स्वतःवर, स्वतःच्या भाषेवर आणि लोकांवर प्रेम करा. इतर भाषा आणि समुदायांचा सन्मान करा," हा त्यांचा संदेश सहअस्तित्व आणि करुणेची शिकवण देतो. चिकमगाळूरच्या हिरव्या टेकड्यांपासून बेंगळुरूच्या गजबजलेल्या गल्ल्यांपर्यंतचा त्यांचा हा प्रवास बदलाची वाट न पाहता स्वतः बदल बनणाऱ्या एका विदुषीची यशोगाथा आहे.