मॉस्को
रशिया दौऱ्यावर असलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध आणि जागतिक परिस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. "जग सध्या अत्यंत अशांत आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे, अशा परिस्थितीत भारत आणि रशियाच्या विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त सामरिक भागीदारीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते," असे स्पष्ट मत डोवाल यांनी या भेटीत मांडले. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोयगू यांच्याची संवादादरम्यान डोवाल यांनी हे मत मांडले.
अध्यक्ष पुतीन यांचे स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल आभार मानताना डोवाल यांनी मे महिन्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, "भारत-रशियाचे संबंध जुने आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत. आमची सामरिक भागीदारी आमच्यासाठी खूप मोलाची आहे."
अध्यक्ष पुतीन यांच्या आगामी भारत दौऱ्याबद्दल आनंद व्यक्त करताना डोवाल म्हणाले, "आम्ही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीबद्दल खूप उत्सुक आहोत. या शिखर परिषदांनी आपल्या संबंधांना नेहमीच एक नवी दिशा दिली आहे. या चर्चेतून ठोस परिणाम साधण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो, यावर विचार करायला हवा. मला आशा आहे की या बैठकीतून काही नवीन कल्पना आणि चांगले निर्णय समोर येतील."
यावेळी डोवाल यांनी २२ एप्रिल रोजी भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल अध्यक्ष पुतीन यांचे विशेष आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास हा संदेश पोहोचवण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. "या हल्ल्यात आम्ही आमचे अनेक जवान आणि नागरिक गमावले. दहशतवादाविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढण्यासाठी आम्ही तुमच्याप्रमाणेच वचनबद्ध आहोत," अशी ग्वाही डोवाल यांनी दिली.
व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती यावरील २५व्या आंतर-सरकारी सत्राच्या यशाचा उल्लेख करत, यावर अधिक सविस्तर चर्चा करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
जागतिक परिस्थितीवर बोलताना डोवाल यांनी रशियाचे मत जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांमुळे जागतिक वातावरण अस्थिर झाले आहे. या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता, हे आम्ही तुमच्याकडून ऐकू इच्छितो. जरी विविध स्तरांवर आपल्यात वेळोवेळी चर्चा होत असली, तरी सध्याच्या एकूण जागतिक परिस्थितीबद्दल तुमचे मत आमच्यासाठी महत्त्वाचे आहे."