गुजरातमध्ये अल-कायदाचे ४ दहशतवादी अटकेत; मोठी घातपाती योजना उधळली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 d ago
गुजरातमध्ये अटक केलेले अल-कायदाचे ४ दहशतवादी
गुजरातमध्ये अटक केलेले अल-कायदाचे ४ दहशतवादी

 

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी अल-कायदाच्या इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार संशयितांना अटक केली आहे. गुजरातमध्ये दोन, दिल्लीत एक आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका संशयिताला पकडण्यात आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी केलेल्या समन्वित कारवाईत हे मोठे यश मिळाले आहे.

अटक करण्यात आलेले हे संशयित अल-कायदाची विचारसरणी पसरवत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, हे संशयित सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना कट्टर बनवून गटात सामील करून घेत होते. तसेच, भारताविरोधी आणि लोकशाहीविरोधी मजकूर प्रसारित करत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पकडलेल्यांमध्ये अहमदाबादचा फरदीन शेख, दिल्लीचा मोहम्मद फाईक, उत्तर प्रदेशातील नोएडामधील झीशान अली आणि गुजरातमधील अरवल्ली जिल्ह्यातील मोडासा येथील सैफुल्ला कुरेशी यांचा समावेश आहे.

गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, अल-कायदाची विचारसरणी पसरवणाऱ्या पाच इन्स्टाग्राम खात्यांबाबत १० जून रोजी मिळालेल्या माहितीवरून ही मोहीम सुरू झाली. या खात्यांवरून धार्मिक आधारावर, लोकशाहीविरोधी आणि भारतविरोधी मजकूर शेअर केला जात होता. एक तांत्रिक चमू तयार करून या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आणि सूत्रधारांना शोधण्यात आले.

जोशी पुढे म्हणाले, "हे चौघेही यात सामील असल्याचे आढळले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती आणि त्यांच्या प्रत्यक्ष हालचालीही संशयास्पद होत्या." फरदीन शेखच्या ताब्यातून एक तलवार आणि अल-कायदाशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. "त्याच्याकडून 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित कागदपत्रेही मिळाली. हा मजकूर भारत सरकारविरोधी, पाकिस्तान समर्थक आणि प्रक्षोभक स्वरूपाचा होता," असे जोशी यांनी सांगितले.

या गटाने अनेक इन्स्टाग्राम गट तयार केले होते. त्यातून जिहादी मजकूर प्रसारित करत भारतात लोकशाहीऐवजी शरिया कायदा लागू करण्याची मागणी करत होते, असा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहम्मद फाईक पाकिस्तानी इन्स्टाग्राम खात्यांशी संपर्कात होता, जे त्याला जिहादी साहित्य पुरवत होते. "ते देशभरात मोठ्या प्रमाणात मजकूर पसरवत होते. त्यांच्या फोनमधून मोठ्या प्रमाणात डेटा जप्त करून त्याचे विश्लेषण केले," असे जोशी यांनी नमूद केले.

या संशयितांवर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायदा (UAPA) च्या कलम १३, १८, ३८ आणि ३९ अंतर्गत, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११३, १५२, १९६ आणि ६८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरदीन आणि सैफुल्ला यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर दोन आरोपी मोहम्मद फाईक आणि झीशान अली यांना आज (गुरुवारी) न्यायालयात हजर केले जाईल.

दरम्यान, सैफुल्लाच्या भावाने आपल्या भावाच्या अटकेवर अविश्वास व्यक्त केला. "त्यांनी फोनवर काय केले किंवा नाही केले हे मला माहीत नाही. तो एका फर्निचर कंपनीत काम करत असे. त्याने नववीच्या पुढे शिक्षण घेतले नाही. सकाळी नऊ वाजता कामावर जायचा आणि रात्री आठ वाजता परत यायचा. पोलिसांनी त्याला काल सकाळी साडेनऊ वाजता पकडले, आम्हाला साडेदहा वाजता कळले. त्याला भेटायला कोणी घरी येत नव्हते," असे तो म्हणाला.

तपास यंत्रणांनी आतापर्यंत कोणताही धोका असल्याचे म्हटले नाही. पण ही कारवाई दहशतवादी कारवायांना आळा घालण्यात एक मोठे यश मानले जात आहे.