पहलगाम हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रा मार्गावर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले असून, ड्रोनविरोधी; तसेच हवाई संरक्षण प्रणालींचा वापर यासह इतर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांविरोधात राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर अमरनाथ यात्रेवरही हल्ल्याचे सावट असल्याने अधिक काळजी घेतली जात आहे.

यात्रेच्या मार्गावर विस्तृत स्वरूपात देखभाल केली जात आहे. उपग्रह, मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) आणि रडारच्या जाळ्याचा वापर करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेच्या दोन्ही मार्गावर बहुस्तरीय सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहे. सीमा, उंच भाग आणि वाहनांनी किंवा पायी जाऊ शकत नसलेल्या भागांची सुरक्षा सैन्याकडे आहे. बालतालमार्गे जाणारा आणि पहलगाममार्गे जाणारा अशा दोन्ही मार्गांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी पोलिस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून, कॅम्पभोवती अधिक सुरक्षा व्यवस्था आहे. यात्रेदरम्यान एकूण ५८१ केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. प्रत्येक यात्रामार्गावर एक एक राष्ट्रीय रायफल्स बटालियनची नियुक्ती करण्यात आली आहे. एका बटालियनमध्ये सामान्यतः १,००० ते १,२०० जवान असतात. यात्रामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सैन्याच्या स्पेशल तुकड्या आणि हवाई दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

अमरनाथ यात्रेच्या प्रत्येक मार्गावर संयुक्त नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये लष्कर, पोलिस, निमलष्करी दल यांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये योग्य समन्वय राखला जात असून, माहितीचे आदान-प्रदानही केले जात आहे.

एका अधिकाऱ्यांनी सांगितले, "विमाने आणि ड्रोनसाठी 'नो-फ्लाय झोन' लागू करण्यात आले आहेत. यात्रामार्गांची प्रवेशद्वारे आणि मार्गावरील डोंगर-दऱ्यांवर सतत निरीक्षण ठेवले जात असून, २४ तास निगराणी ठेवण्यात आली आहे. या मार्गावर जवानांकडून वारंवार गस्त घालण्यात येते आणि सर्व व्यक्तींची बहुस्तरीय सुरक्षा तपासणी केली जाते. लहान ड्रोनसह काही विशिष्ट उपकरणे घेऊन जाण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत."