आयतुल्ला अली खामेनी यांच्या स्मरणार्थ दिल्लीत शोकसभा; सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांची उपस्थिती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील इराण कल्चर हाऊसमध्ये माजी इराणी सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर ४० व्या दिवशी एका स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक नामवंत राजकीय नेते, मुत्सद्दी आणि विविध समुदायांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते.

कार्यक्रमात विविध संघटना आणि सामाजिक गटांतील व्यक्तींच्या उपस्थितीमुळे सर्वसमावेशक स्वरूप दिसून आले. मीनाब शालेय घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींची छायाचित्रेही यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती, ज्यामुळे वातावरणात अधिक गांभीर्य निर्माण झाले होते.

भारतातील माजी सर्वोच्च नेत्याचे प्रतिनिधी हकीम इलाही यांनी उपस्थितांना संबोधित करताना हा प्रसंग आठवणी आणि चिंतनाचा असल्याचे सांगितले. आयतुल्ला अली खामेनी यांच्या निधनाला ४० दिवस पूर्ण झाल्याचे सांगून त्यांनी खामेनींचे वर्णन मानवता, न्याय आणि सत्यासाठी आयुष्य समर्पित करणारे नेते असे केले. इलाही पुढे म्हणाले, ही सभा भारतातील लोकांनी दाखवलेली एकता आणि करुणेचे प्रतीक आहे. अशी एकता मानवता, प्रतिष्ठा आणि शांततेच्या सामायिक मूल्यांचे दर्शन घडवते. इतिहासातील अनेक क्षण शब्दांच्या पलीकडचे असतात आणि लोकांनी दिलेला हा प्रतिसाद नैतिक धैर्य व बंधुभाव दर्शवतो, असेही त्यांनी नमूद केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही यावेळी आपले विचार मांडले. तत्वांवर ठाम राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नेत्याची आठवण काढली जात आहे, त्यांच्या शिकवणी मानवतेसाठी महत्त्वाच्या राहतील. राष्ट्रांसाठी सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सांस्कृतिक अखंडतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नक्वी यांनी नमूद केले, विविध समुदायांचे लोक प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले आहेत.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी श्रोत्यांना संबोधित करताना या प्रसंगाचा व्यापक संदेश दिला. ही सभा त्यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा गौरव करण्यासाठी आयोजित केली असून प्रतिष्ठा, श्रद्धा आणि मृत्यूसमोरही न डगमगणाऱ्या जिद्दीचे दर्शन यातून घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

शांतता, न्याय आणि सामायिक मानवी मूल्यांचा पुनरुच्चार करत या कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांनी अत्यंत गंभीर वातावरणात आपले आदर व्यक्त केले.