मसूरीतील अजान : द्वेषाच्या भाऊगर्दीत सलोख्याचा सूर

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 5 h ago
मसूरीतील विहंगम दृश्य
मसूरीतील विहंगम दृश्य

 

मलिक असगर हाश्मी

रात्रीचे आठ वाजून वीस मिनिटांची वेळ होती. पर्वतांच्या सौंदर्याची राणी म्हटली जाणारी मसूरी, या क्षणी आकर्षणाच्या परमोच्चस्थानी होती. उत्तराखंडच्या या डोंगराळ  शहरातील हवेत गारवा होता, पण मॉल रोडवर सर्वत्र रोषणाई, गर्दी आणि नात्यांची ऊब पसरलेली होती. दिवाळीचे चमकणारे दिवे, सजलेली दुकाने आणि त्यातून डोकावणारी प्रेमी जोडपी—हे दृश्य एखाद्या चित्रापेक्षा कमी नव्हते. मी मसूरीच्या याच प्रसिद्ध मॉल रोडवर पोलीस बॅरिकेडजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बाकावर बसलो होतो. दिवसभराच्या चढाईच्या आणि फिरण्याच्या थकव्यातून थोडा आराम मिळवण्याच्या प्रयत्नात.

तेव्हाच, त्या संपूर्ण रंगीत आणि उत्साही वातावरणाला छेदणारा एक आवाज कानावर आदळला—"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर...". ही इशाची अजान होती.  मॉल रोडच्या मध्यभागी असलेल्या एका गल्लीतील मशिदीतून लाऊडस्पीकरवरुन ती दिली जात होती. मशिदीचा मुअज्जिन (अजान देणारा) नमाजींना प्रार्थनेसाठी आमंत्रित करत होता.

क्षणभर विश्वास बसला नाही की, खरंच मसूरीसारख्या प्रमुख पर्यटन शहरात, जिथे देश-विदेशातून हजारो पर्यटक येतात, तिथे मशिदीतून इतक्या खुलेपणाने आणि मोठ्या आवाजात अजान दिली जात आहे. विशेषतः तेव्हा, जेव्हा अलिकडच्या वर्षांत उत्तराखंडच्या काही भागांमधून मुस्लिमांविरुद्ध असहिष्णुतेच्या बातम्या सतत सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेल्सवरून चर्चेत होत्या.

d

खरं तर, गुरुग्रामहून मसूरीला येण्यापूर्वी मीसुद्धा गुगलवर उत्तराखंडमधील मुस्लिम समाजाच्या स्थितीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. सर्चचे निकाल निराशाजनक होते. काश्मीरमधून आलेल्या काही तरुणांना दुकान लावण्यास मनाई करून मारहाण करून पळवून लावल्याची घटना, एका मुस्लिम चहा विक्रेत्याला अटक आणि एका मशिदीत घुसून दारूच्या नशेत गोंधळ घातल्याची बातमी. या बातम्यांनी प्रवासापूर्वीच मनात भीती आणि शंका निर्माण केली होती. कुठे द्वेष किंवा भेदभावाचा सामना करावा लागला तर नाही ना, ही चिंता मनाला सतत टोचत होती.

पण त्या रात्री जेव्हा अजानचा आवाज कानावर पडला, तेव्हा हृदयाला एक खोल शांतता मिळाली. जणू एखाद्या अंधाऱ्या खोलीत अचानक दिवा लागावा, तसाच काहीसा तो अनुभव होता. मनातील शंका क्षणात नाहीशा झाल्या. मसूरीच्या वातावरणात त्या रात्री केवळ अजानचा आवाज नव्हता तर त्यात सामावलेला होता सलोखा, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचा जिवंत पुरावा.

त्यानंतर मी मसूरीला मोकळ्या मनाने आणि आत्मीयतेने पाहिले आणि अनुभवले. मॉल रोडवर फिरताना जेव्हा लोकांच्या डोळ्यात पाहिले, दुकानदारांशी बोललो आणि मुस्लिम व्यापाऱ्यांकडून हसून वस्तू खरेदी केल्या, तेव्हा कुठेही तो वैरभाव दिसला नाही, ज्याची कल्पना सोशल मीडियाने करून दिली होती.

मसूरीचे जमिनीवरील वास्तव यापेक्षा खूप वेगळे आहे. आकडेवारीनुसार, या शहरात सुमारे ३१ हजार मुस्लिम राहतात. मसूरीत प्रवेश करण्यापूर्वीच एक मोठे मुस्लिम कब्रस्तान आहे, जे येथील मुस्लिम समाजाच्या जुन्या आणि स्थायी उपस्थितीची पुष्टी करते.

मॉल रोडवर फिरताना अनेक दुकानांचे फलक उर्दूमध्ये लिहिलेले दिसले. गरम कपड्यांच्या दुकानांपासून ते खाण्यापिण्याच्या स्टॉल्स आणि हॉटेल्सपर्यंत—मुस्लिम समुदाय येथील व्यापारी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. मशिदीजवळ असलेले 'चाचा का हॉटेल' आणि 'अल-कुरेश हॉटेल' यांसारखी ठिकाणे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.

येथील प्रमुख मशिदींमध्ये लंढौरची जामा मशीद, मशीद अमानिया आणि जाखन मशीद यांचा समावेश आहे. यापैकी लंढौरची मशीद ऐतिहासिक महत्त्व राखून आहे. या मशिदी केवळ प्रार्थनास्थळे नाहीत, तर शहराच्या धार्मिक विविधतेचे आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीकही आहेत.

स्थानिक पोलीस प्रशासनही या वातावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवते. मसूरीचे कोतवाल अरविंद चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, "मुस्लिम समाजाबद्दल डोंगराच्या पायथ्याशी जशी विचारसरणी बनवली जाते, तसे काही मसूरीच्या सामाजिक वातावरणात दिसून येत नाही."

खरं तर, जेव्हा जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये एका दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधी निदर्शने झाली, तेव्हा मसूरीच्या मुस्लिम तरुणांनीही त्यात भाग घेतला होता. आसिफ, कामिल अली, अयुब शाबरी, शहीद मन्सूर यांसारख्या अनेक तरुणांनी भारताच्या बाजूने आवाज उठवला होता. हे दाखवते की, येथील मुसलमान आपल्या देशाप्रती समर्पित आणि सामाजिक जबाबदाऱ्यांप्रति जागरूक आहेत.

d

स्थानिक ज्येष्ठ नागरिक मंजूर अहमद सांगतात की, मशिदीत घुसून गोंधळ घालणारी व्यक्ती खरं तर नशेच्या अवस्थेत होती, तिचा कोणताही धार्मिक किंवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे अशा घटनांना संपूर्ण समाजाच्या विरोधात पाहून चुकीचे निष्कर्ष काढणे अत्यंत अनुचित आहे. मसूरीतील पर्यटकांच्या गर्दीत आजही सुमारे २० ते २५ टक्के मुसलमान दिसतात, जे या शहरात द्वेष नाही, तर प्रेमाचे वातावरण असल्याचेच प्रमाण आहे.

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्येही हा सलोखा स्पष्ट दिसतो. धामा बाजार, मोती बाजार, पलटन बाजार आणि डिस्पेन्सरी बाजार यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये मुस्लिमांची डझनभर दुकाने आहेत. या बाजारांमध्ये मोठ्या संख्येने बुरखा आणि हिजाब घातलेल्या मुस्लिम महिला खरेदी करताना दिसतात. येथील भव्य जामा मशीद मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आधारस्तंभ आहे.

उत्तराखंडमधील या सलोख्याची मुळे केवळ वर्तमानापुरती मर्यादित नाहीत, तर त्याचा इतिहासही तितकाच समृद्ध आणि प्रेरणादायक आहे. अहमदिया मुस्लिम समुदायाचे दुसरे खलिफा हजरत मुसलेह-ए-मौऊद (मिर्झा बशीर-उद-दीन महमूद अहमद) यांनी १९३१ साली मसूरीला भेट दिली होती. ही भेट धार्मिक सहिष्णुता, हिंदू-मुस्लिम एकता आणि इस्लामी प्रचाराच्या सिद्धांतांवर आधारित होती.

१९ एप्रिल १९३१ रोजी हजरत मुसलेह-ए-मौऊद (र.अ.) कादियानहून मसूरीला पोहोचले. त्यांनी २४ एप्रिलला मसूरीच्या अहमदिया मशिदीत शुक्रवारचा खुत्बा (धार्मिक प्रवचन) दिला, ज्यात त्यांनी मसूरीला भारतातील एकमेव पहाडी क्षेत्र म्हटले, जिथे अहमदिया मुस्लिमांची स्वतःची मशीद आहे.

२६ एप्रिल १९३१ रोजी, त्यांनी मसूरीच्या टाऊन हॉलमध्ये "भारताची प्रगती आणि हिंदू-मुस्लिम एकता" या विषयावर एक ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी त्या वेळी सुरू असलेल्या सांप्रदायिक तणावांची तीन मुख्य कारणे सांगितली—धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय मतभेद.

d

त्यांनी सांगितले की, धार्मिक सणांवरून वाद होतात, कारण आपण सहिष्णुतेचा खरा अर्थ समजत नाही. सहिष्णुता म्हणजे केवळ इतरांना सहन करणे नव्हे, तर त्यांना त्यांच्या धर्मानुसार जगू देणे आणि त्यांचा आदर करणे. त्यांनी सांगितले की, सर्व धार्मिक समुदायांनी एकमेकांच्या नायकांचा सन्मान केला पाहिजे आणि आपल्या धर्माचा प्रचार करताना, दुसऱ्या धर्माची निंदा करणे टाळावे.

राजकीय समाधानासाठी, त्यांनी सुचवले की, हिंदू बहुसंख्याकांनी मुस्लिमांना काही राजकीय सवलती द्याव्यात आणि मुस्लिमांनी हे आश्वासन द्यावे की, देशावर कोणत्याही विदेशी हल्ल्याच्या स्थितीत, मग तो हल्ला मुस्लिम देशाकडूनच का असेना, ते भारतासोबत उभे राहतील.

१ मे रोजी, हजरत मुसलेह-ए-मौऊद देहरादूनला पोहोचले, जिथे त्यांनी इस्लामिया स्कूलमध्ये एक सार्वजनिक व्याख्यान दिले. २ मे रोजी ते दिल्लीला रवाना झाले. त्यांनी जोर देऊन सांगितले की, प्रत्येक सदस्याने मुबल्लिग (प्रचारक) बनले पाहिजे. त्यांचे मत होते की, इस्लामचा खरा चेहरा जगाला दाखवण्यासाठी मुस्लिमांना सत्यनिष्ठ, नम्र आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्हावे लागेल.

मसूरीच्या मॉल रोडवर घुमणारी अजान केवळ एक धार्मिक आवाहन नाही, तर ती त्या सलोख्याची, सामायिक संस्कृतीची आणि गंगा-जमुनी तहजीबची (संस्कृती) साद आहे, जी भारताच्या आत्म्यात वसलेली आहे. अजानचा हा आवाज सांगतो की, द्वेषाच्या कथा कितीही जोरात रचल्या गेल्या, तरी सत्याचा आवाज त्याहून कितीतरी अधिक खोल आणि सशक्त असतो.

मसूरी केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर ते त्या भारताचे उदाहरण आहे जिथे मंदिर आणि मशीद एकाच रस्त्यावर आहेत, आणि जिथे हृदयांमध्ये प्रेम आजही जिवंत आहे.

(लेखक 'आवाज द व्हॉइस'च्या हिन्दी विभागाचे संपादक आहेत.)