आवाज द व्हॉइस मराठी, पुणे
पुण्यातील शनिवारवाड्याच्या एतिहासिक परिसरात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत परिसरात आंदोलने केली. त्यानंतर ऐतिहासिक स्मारक परिसरात नमाज पठण केल्याप्रकरणी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन महिलांविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार आता तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खासदार मेधा कुलकर्णी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नमाज पठन झालेल्या जागी गोमुत्र शिंपडून आणि शेणाने सारवून त्या जागेचे ‘शुद्धीकरण’ केले. या घटनेनंतर मात्र खासदारांच्या या कृतीविरोधात सामाजिक आणि राजकीय स्तरातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्या.
आंदोलनाला भाजपच्या सहकारी पक्षाचाही विरोध
राज्यातील सत्ताधारी भाजपाचाच सहकारी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) महिल्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "शनिवारवाड्यात सर्व जातीधर्माचे लोक येतात. काही बुरखा परिधान करून आलेल्या माता-भगिनी तिथे चादर टाकून बसल्या. नंतर त्यांनी तिथेच बसून प्रार्थना केली, दुवा मागितली म्हणून शनिवारवाड्याचं पावित्र्य नष्ट होत नाही. खासदारांनी संविधानानुसार वागायला हवे. तुम्ही सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांच्या खासदार आहात. पुण्यातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवू नका, कारण पुण्यात हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतात."
मुस्लीम महिला सामाजिक कार्यकर्तीने मांडली सामाजिक समस्या
'मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन'च्या डॉ. फरहा अन्वर यांनी या घटनेकडे दोन महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या की, "सार्वजनिक, ऐतिहासिक किंवा पर्यटन स्थळांवर धार्मिक विधी करू नयेत. तथापि, त्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याची वेळ का आली, याच्या मुळाशी जाणे अत्यावश्यक आहे."
त्या पुढे म्हणाल्या, “"जर शहरातील मशिदींचे दरवाजे मुस्लिम महिलांसाठी आदराने खुले असते, तर त्यांना शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात नमाज अदा करण्याची गरज भासली नसती. शहरातील अनेक मशिदींमध्ये महिलांना प्रार्थनेसाठी प्रवेश, सुविधा किंवा सुरक्षित जागा उपलब्ध नाही. ही व्यवस्थात्मक समस्याच आजच्या अनावश्यक वादाचे खरे कारण आहे."
महिलांना मशिदींमध्ये प्रवेश मिळावा यासाठी डॉ. फरहा गेल्या १० वर्षांपासून घटनात्मक आणि सामाजिक लढा देत आहेत. त्यांनी भारतातील अनेक प्रमुख मशिदींशी अधिकृत पत्रव्यवहार करून महिलांना नमाज अदा करण्यासाठी प्रवेश आणि सुविधांची मागणी केली आहे. यासंबंधी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दारही ठोठावले असून, त्यावरील सुनावणी अजून प्रलंबित आहे.
सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण टाळा, सलोखा पाळा - मौलाना मोहम्मद तौफिक अशरफी
या मुद्द्यावर गुलशन-ए-गरीब नवाज मशिदीचे खतीब आणि इमाम, मौलाना मोहम्मद तौफिक अशरफी यांनी शनिवारवाडा प्रकरणावर इस्लामिक दृष्टिकोन मांडला आहे. ते म्हणाले, "इस्लामिक दृष्टिकोनातून, महिलांनी नमाज पढण्यासाठी काही नियम बनवले आहेत. शरियतनुसार, महिलांनी घरातच नमाज पढणे अधिक चांगले आहे. तुम्ही कधीही महिलांना ईदच्या दिवशी ईदगाहमध्ये नमाज पढताना पाहिले नसेल. कारण महिलांना ही विशेष सवलत दिली गेली आहे की, त्या घरातच नमाज पढू शकतात."
त्यांनी पुढे सांगितले, "पुण्यातील शनिवारवाडा हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, सार्वजनिक जागा आहे. असे सांगितले जात आहे की, काही मुस्लिम महिलांनी तिथे नमाज अदा केली. तर इस्लामच्या दृष्टिकोनातूनही ही एक अनावश्यक कृती होती. कारण ती जागा सार्वजनिक आहे, जिथे मागून लोक येत-जात असतात. इस्लामने अशा ठिकाणी महिलांना नमाज पढण्यास मनाई केली आहे."
"आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो, सन्मान करतो. त्यामुळे जर हे (सार्वजनिक ठिकाणी नमाज) स्वीकारार्ह नसेल, तर आपण कटाक्षाने ते टाळले पाहिजे. आपला इस्लाम कधीही अशा गोष्टींना प्रोत्साहन देत नाही, परवानगी देत नाही की, आमच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाव्यात किंवा कोणाचे मन दुखावले जावे. त्यामुळे ज्या मुस्लिम महिलांनी तिथे नमाज अदा केली, त्यासाठी आम्ही एक प्रकारे माफी मागतो," असे मौलाना अशरफी यांनी पुढे स्पष्ट केले.
मुस्लिम पुरुषांनाही सल्ला देताना मौलाना अशरफी यांनी विनंती केली की, "आजच्या वातावरणात पुरुषांनीही सार्वजनिक ठिकाणी नमाज पढणे टाळावे. जर कोणाला ती गोष्ट आवडत नसेल आणि त्यामुळे वाद वाढण्याची किंवा कारवाई होण्याची शक्यता असेल, तर आपण ते टाळले पाहिजे, यातच शहाणपण आहे."
शनिवारवाडा मराठा साम्राज्याच्या शौर्याचा, पेशव्यांच्या वैभवाचा आणि एका विलक्षण प्रेमकहाणीचा साक्षीदार आहे. बाजीराव पेशवा पहिले यांनी १७३२ मध्ये बांधलेला हा वाडा, एकेकाळी मराठा सत्तेचे केंद्र होता. याच वाड्यातून बाजीरावांनी अटकेपार झेंडे लावले आणि मराठा साम्राज्याचा विस्तार केला. पण शनिवारवाडा केवळ राजकीय घडामोडींपुरताच मर्यादित नाही. तो बाजीराव आणि त्यांची दुसरी पत्नी, मस्तानी यांच्या प्रेमकहाणीमुळेही अजरामर झाला आहे. बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल यांची कन्या असलेल्या मस्तानी या मुस्लिम होत्या असे समजले जाते. बाजीरावांनी मस्तानी यांच्याशी विवाह करून, त्यांच्या मुस्लिम धर्माचा आणि आचरणाचा पूर्ण आदर ठेवला. शनिवारवाडा परिसरात त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती, जिथे त्या आपल्या धार्मिक रीतीरिवाजांचे पालन करू शकत होत्या. त्या काळात, राजकीय अस्थिरता असूनही, बाजीरावांनी दाखवलेली ही सहिष्णुता विशेष महत्त्वाची होती.
बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकथा ही केवळ इतिहासाच्या पानांपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांचे वंशज नवाब अली बहादूर यांचे घराणे आजही अस्तित्वात आहेत. आणि वेळोवेळी ते या वास्तूला भेटही देतात. हे घराणे त्या ऐतिहासिक हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक आहेत. राजकीय संघर्षाच्या काळातही धार्मिक सलोखा आणि परस्पर आदराचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
२०१५मध्ये आलेल्या 'बाजीराव मस्तानी' या भव्य चित्रपटामुळे शनिवारवाडा आणि या ऐतिहासिक व्यक्तिरेखांविषयीचे कुतूहल प्रचंड वाढले. या चित्रपटाने बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमकथेतील गुंतागुंत, त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक पैलू मोठ्या पडद्यावर आणले, ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये या वास्तूविषयी आणि तिच्या इतिहासाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. आजही अनेक पर्यटक केवळ शनिवारवाड्याची भव्यता पाहण्यासाठीच नव्हे, तर त्या भिंतींआड दडलेल्या बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकहाणीच्या खुणा शोधण्यासाठी येथे येतात.