नवी दिल्ली
भारतीय रेल्वेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला आणि अफवांना आळा घालण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने आता स्वतःचे 'फॅक्ट-चेक' युनिट सुरू केले आहे. @RailFactCheck या नावाने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर हे नवे हँडल सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून रेल्वे संबंधित खोट्या बातम्या आणि दाव्यांचे खंडन केले जाणार आहे.
या हँडलने आपले काम सुरू करताच, काँग्रेस पक्षाने रेल्वेबद्दल केलेल्या काही दाव्यांना खोडून काढले आहे. काँग्रेसने म्हटले होते की, सरकार रेल्वेचे खासगीकरण करत आहे, ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद केली आहे आणि स्लीपर कोच कमी केले आहेत. यावर @RailFactCheck ने सविस्तर आकडेवारी देत हे सर्व दावे कसे चुकीचे आहेत, हे स्पष्ट केले आहे.
रेल्वेने म्हटले आहे की, "या फॅक्ट-चेक युनिटचा उद्देश रेल्वेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला वेळीच रोखणे आणि जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवणे हा आहे." सोशल मीडियावर रेल्वेबद्दल अनेकदा चुकीची माहिती व्हायरल होते, ज्यामुळे प्रवाशांमध्ये गैरसमज निर्माण होतात. या नव्या हँडलमुळे आता प्रवाशांना अधिकृत आणि अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो' (PIB) चे स्वतःचे फॅक्ट-चेक युनिट कार्यरत आहेच, आता त्यात रेल्वेच्या या नव्या युनिटची भर पडली आहे.