गँगस्टर-दहशतवाद्यांच्या नेटवर्कवर NIAची मोठी कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नवी दिल्ली : गँगस्टर आणि दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने पाच राज्यांमध्ये ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएची ही कारवाई ज्या राज्यांमध्ये सुरू आहे, त्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली-एनसीआरचा समावेश आहे.

गँगस्टर आणि दहशतवादी यांच्यातील नेटवर्क एनआयए संपवायचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळणार नाही. मागील काही दिवसांपासून एनआयए अशा लोकांवर कारवाई करत आहे, जे दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समर्थन देतात.

काही दिवसांपूर्वी एनआयएने खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (एसएफजे) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर कठोर कारवाई केली होती. एनआयएने शनिवारी बंदी घातलेल्या 'सिख फॉर जस्टिस' संघटनेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांची चंदीगड आणि अमृतसरमधील स्थावर मालमत्ता जप्त केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थक पन्नूच्या चंदीगडमधील निवासस्थानाबाहेर आणि अमृतसरमधील शेतजमिनीला मालमत्ता जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.