नवी दिल्ली- लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिल अली यांच्याबाबत बोलताना पातळी सोडली होती. त्यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रमेश बिधुरी यांच्यावर टीका केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दानिश अली यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
दानिश अली यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळले. त्यांना प्रतिक्रिया देणे देखील जड जात होते. ते म्हणाले की, लोकसभेत अपमान झाल्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. भाजप खासदार बिधुरी यांच्याविरोधात कारवाई झाली नाही तर मी खासदारकीही सोडण्याचा विचार करु शकतो, असं ते म्हणाले आहेत.
दानिश अली म्हणाले की, 'संसद भरली असताना एका खासदारासोबत असं होत असेल तर सामान्य लोकांची काही स्थिती असेल. मी इतका दु:खावला गेलो होतो की मला रात्रभर झोप आली नाही. मला असं वाटतंय की माझ्या डोक्यातील नस फुटली आहे.' दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना पत्र लिहून रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दानिश अली यांनी पत्र लिहून हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. हा पहिला प्रसंग आहे, जिथे संसदेमध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे. अल्पसंख्याक नेत्याला भरसभेत अपमानित करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते का? असा सवाल त्यांनी केलाय.
माहितीनुसार, भाजपने रमेश बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी बिधुरी यांना इशारा दिला आहे. पुन्हा असे वर्तन झाल्यास कडक पाऊल उचलणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं कळतंय. लोकसभेच्या कामकाजातून त्यांचे संभाषण वगळणात येणार असल्याची शक्यता आहे.
लोकसभेतील प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. मायावती, लालू यादव आणि काँग्रेसने रमेश बिधुरी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याप्रकरणात काय कारवाई होईल हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, सदर घटनेबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.