भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड कॉरिडॉरवर (बुलेट ट्रेन प्रकल्प) आता जपानी बुलेट ट्रेनऐवजी स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली 'वंदे भारत' सेमी-हाय स्पीड ट्रेन धावणार आहे. भारतीय रेल्वेची पहिली वंदे भारत ट्रेन ताशी २५० किलोमीटर वेगाने धावणार आहे. यापूर्वी मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान ताशी ३२० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार असल्याचा दावा केला जात होता.
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड कॉरिडॉरच्या सुरत-बिलिमोरा (५० किमी) विभागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेनची चाचणी धाव सुरू होईल हे महत्त्वाचे आहे.
२०२७ पर्यंत प्रवासाला सुरुवात
२०२७ पर्यंत सामान्य नागरिक वंदे भारत (सीटिंग) ट्रेनमधून प्रवास करू शकतील. या मार्गावर प्रत्येकी आठ डब्यांच्या दोन वंदे भारत ट्रेन धावतील. या ट्रेनचा कमाल वेग ताशी २८० किलोमीटर असला तरी, त्या ताशी २५० किलोमीटर वेगाने धावतील.