लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार देणार मध्यमवर्गीयांना गिफ्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
होमलोन
होमलोन

 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

केंद्र सरकार मध्यमवर्गाला आवास योजनेंतर्गत मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. लोकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जावर मोठी सूट देण्यात येणार आहे. यासाठी सरकार पुढील ५ वर्षांसाठी ६०० अब्ज रुपये खर्च करणार असल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी या योजनेबाबत उल्लेख केला होता. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती.

रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. ९ लाखापर्यंतच्या कर्जावर ३.६ ते ५ टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज अनुदान सरकार देऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेल्या ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ही योजना लागू राहील. ही योजना २०२८ सालापर्यंत लागू केली जाण्याती शक्यता आहे. या योजनेंतर्गत शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय २५ लाख कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो.

शहर विकास मंत्री आणि अर्थ मंत्रालयाने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या योजनेसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांची आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक लवकरच होणार आहे. बँकांनी लाभार्थींची यादी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जातंय.

देशात लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. तसेच देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकारकडून मतदारांना खूश करण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. सध्या देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लोक हैराण आहेत. यासाठी सरकारकडून नव्या योजनांची घोषणा होत आहे. सरकारने नुकतंच विश्वकर्मा योजना लागू केली आहे.