मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या 'कोलड्रिफ' (Coldrif) या विषारी कफ सिरप प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने हे 'किलर' कफ सिरप बनवणाऱ्या 'श्रीसन फार्मा' (Sresan Pharma) या कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. चेन्नई आणि मदुराईमधील कंपनीच्या कार्यालयांवर आणि संचालकांच्या निवासस्थानांवर ही छापेमारी सुरू असून, यात मनी लाँड्रिंगचाही संशय व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी छिंदवाडा येथे काही मुलांचा गूढ आजाराने मृत्यू झाला होता. तपासात असे समोर आले होते की, या मुलांनी सेवन केलेल्या 'कोलड्रिफ' नावाच्या कफ सिरपमध्ये 'डायथिलीन ग्लायकोल' (DEG) या विषारी औद्योगिक रसायनाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होते. यानंतर, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) तामिळनाडूतील या कंपनीचा उत्पादन परवाना रद्द करण्याची शिफारस केली होती आणि फौजदारी कारवाई सुरू केली होती.
आता या प्रकरणात ईडीने उडी घेतली आहे. कंपनीने विषारी घटक वापरून मोठ्या प्रमाणात बनावट औषधे विकून अवैध संपत्ती गोळा केल्याचा ईडीला संशय आहे. या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि बँक खात्यांचे तपशील जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
या कारवाईमुळे बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. ईडीच्या या तपासामुळे या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.